भंडाऱ्यात सामाजिक न्याय सभा सुखदेव थोरात यांचे प्रतिपादनभंडारा : भारतीय राज्यघटना अंमलात येवून ६५ वर्षे झाली तरी आजही देशातील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात विषमता दिसून येते. समकाळात तर सामाजिक स्वातंत्र्याचे, न्यायाचे, अभिव्यक्तीचे प्रश्न अधिकच बिकट झाले आहेत. या दृष्टीने या सर्व समाज घटकाच्या विकासाकरिता संघटितपणे विचार, चिंतन व समूह चर्चा करून एक सखोल कालबद्ध कृती कार्यक्रम आखण्याची व त्याकरिता आंबेडकरी चळवळीची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे, असे मौलिक विचार विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समिती भंडारा आणि असोसिएशन फॉर सोशल जस्टीस अॅण्ड इकॉनॉमिक एम्पावरमेंट, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रराज सभागृहात आयोजित सामाजिक न्याय सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक व विचारवंत माजी प्राचार्य भगवान सुखदेवे होते.थोरात म्हणाले, समानता, सामाजिक न्यायाचा गाभा आहे. जाती व्यवस्था केवळ सामाजिक क्षेत्रातच नाही तर धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक व रोजगार क्षेत्रातही आहे. अस्पृश्य दलितांना शिक्षण, जमिन, उद्योगधंदे इत्यादी क्षेत्रातील अधिकार नाकारण्यात आले होते. नाकारलेल्या अधिकाराची नुकसान भरपाई म्हणजे आरक्षण होय. स्वातंत्र्यानंतर सामाजिक न्यायाचा प्रश्न नव्या राष्ट्र उभारणीच्या संविधानिक चळवळीतून पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज देशात जीवनातील सर्व प्रकारच्या विषमता, आवाहन म्हणून उभ्या आहेत. या विषमता नष्ट करण्यासाठी प्रेरित झालेल्या चळवळींना भावनात्मक आंदोलनातच गुंतवून ठेवण्यास भाग पाडणारे षडयंत्र प्रस्थापित व प्रतिगामी व्यवस्थेकडून सातत्याने रचले जात आहेत. याकरिता दलितांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे.प्रा. डॉ. गौतम कांबळे व डॉ. पारीश भगत यांचेही समयोचित मार्गदर्शन झाले. सभाध्यक्ष भगवान सुखदेवे यांनी देशातील वर्तमान परिस्थिती व दलित चळवळीची चिकित्सा करून चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रलोभनाला बळी न पडता चळवळीचे उद्दिष्ट समजून कार्य करावे, असे मत व्यक्त केले. प्रा. डॉ. के.एल. देशपांडे व इंजि. रूपचंद रामटेके यांनी भंडारा नगरीच्या वतीने डॉ. सुखदेवे थोरात यांचा शाल, ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. मंचावर डी.एफ. कोचे, डॉ. जी. भैय्यालाल व संयोजक अमृत बन्सोड यांची उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन डॉ. अनिल नितनवरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. उमेश बन्सोड, प्रास्ताविक अमृत बन्सोड यांनी केले तर आभार डॉ. सिद्धार्थ मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाकरिता डॉ. अनिल नितनवरे अमृत बन्सोड, डॉ. सिद्धार्थ मेश्राम, डॉ. भय्यालाल, गुलशन गजभिये, संजय बन्सोड, प्रा. के.एल. देशपांडे, इंजि. रूपचंद रामटेके, आदिनाथ नागदेवे, असित बागडे, धर्मदीप कांबळे, अरुण अंबादे, उपेन्द्र कांबळे, माणिकराव रामटेके, भाविका उके, एस.एस. साठवणे, माया उके, ए.पी. गोडबोले, व्ही.डी. मेश्राम, एम.डी. गेडाम, आनंद गजभिये, करण रामटेके, डॉ. सलील बोरकर, डॉ. डी.आय. शहारे इत्यादींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
आंबेडकरी चळवळीच्या पुनर्बांधणीची गरज
By admin | Published: December 20, 2015 12:28 AM