कित्येक वर्षापासून शासनाकडे पालांदूरच्या तलाठी कार्यालयाच्या इमारती करिता मागणी केलेली आहे. तालुक्यातील काही ठिकाणी स्वतंत्र तलाठी व मंडळ अधिकारी यांना कार्यालय दिली आहेत. त्याच धर्तीवर पालांदूर येथे सुद्धा किमान तलाठी कार्यालय तरी द्यावे. मंडळ अधिकारी व तलाठी एकाच छताखाली बसून पडक्या इमारतीत काम करीत आहेत. जागा अपुरी असल्याने शेतकऱ्यांनासुद्धा उभ्याउभ्याच काम करावे लागते. बरेचदा जागा नसल्याने परत फिरावे लागते. पालांदूर मंडळांतर्गत २८ गावांचा महसुली कारभार चालतो तर तलाठी कार्यालय अंतर्गत ५ गावांचा कारभार चालविल्या जातो. पालांदूर हलक्यातून सर्वाधिक महसूल शासनाला जमा केला जातो. तरीही प्रशासन स्तरावरून तलाठी कार्यालय पालांदूरला इमारतीकरिता निधीची तरतूद अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही.
कौलारू छताच्या खाली तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयाचे काम सुरू आहे. वादळ ,वारा, पाऊस झाल्यास धोका नजरेसमोर दिसतो. शासकीय दप्तरसुद्धा मजबूत छताशिवाय संकटात आहे. पक्क्या इमारतीची नितांत गरज आहे.