चंद्रशेखर चाकाटे यांचे प्रतिपादन : जिल्हा परिषद हायस्कूलचे स्नेहसंमेलनलाखनी : विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय गाठण्यासाठी अभ्यासूवृत्ती अंगी बाळगणे गरजेचे आहे. यासोबतच कठीण परिस्थितीवरही मात करण्यासाठी चिकाटी, ध्यानसाधना व मोठ्यांचा आदर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ठाणेदार चंद्रशेखर चाकाटे यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव (सडक) येथे स्नेहसंमेलनादरम्यान ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद शिवणकर हे होते. यावेळी सरपंच श्याम शिवणकर, गटशिक्षणाधिकारी दिलीप वाघाये, सुधीर मेश्राम, बाळा शिवणकर, होमदेव कापगते, श्रावण कापगते, अर्चना मेश्राम, कल्पना तवाडे, केंद्रप्रमुख सुजाता बागडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना चाकाटे यांनी अध्यापन करताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जागृत व मानसिक तयारी ठेवून विद्यार्जन करावे व विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांनी संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसवा आयोग या स्पर्धा परीक्षांकडे वळून आय.पी.एस., आय.ए.एस. बनण्याची जिज्ञासा मनात ठेवावी. विदर्भातील आय.पी.एस., आय.ए.एस. या क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी दिलीप वाघाये यांनी विद्यार्थी हे शिक्षकांपेक्षा हुशार आहेत. त्यांना फक्त योग्य मार्गदर्शन व प्रेरणा देण्याची गरज आहे. जिज्ञासू वृत्ती, मेहनत, ज्ञानरचनावाद, आजची शिक्षण प्रणाली, स्पर्धेचे युग या विषयाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अविनाश पाठक यांनी केले. संचालन डी.बी. भुरे यांनी केले. दरम्यान सांस्कृतिक स्नेहसोहळ्यादरम्यान पार पडलेल्या सांस्कृतिक, बौद्धिक, शारीरिक स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय विजेत्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. दहावी व बारावीच्या परीक्षेत प्राविण्य श्रेणी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. बक्षिस वितरण कार्यक्रमाचे संचालन पी.जी. भुरे यांनी केले. तर आभार वाय.आर. गायकवाड यांनी मानले. स्नेहसंमेलनासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
ध्येयासाठी अभ्यासवृत्तीची गरज
By admin | Published: February 03, 2016 12:45 AM