काशिवार यांचे प्रतिपादन : कोरडवाहू क्षेत्र विकास शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमसाकोली : निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत असलेल्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी सरकार शेतकरी हित जोपासून शासनाच्या विभिन्न योजनेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. शेतकरी बांधवांनीसुद्धा सरकार देईल तेव्हाच आम्हाला न्याय मिळेल. ही वृत्ती दूर सारुन शाश्वत शेती करण्याची गरज आहे. तेव्हाच शेतकरी आर्थिकरित्या सक्षम होईल.स्थानिक तालुका बीज गुणन केंद्रात आयोजित राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात या क्षेत्राचे आमदार बाळ काशिवार यांनी वरिष्ठ प्रतिपादन केले. यावेळी मंचावर पशुवैद्यकीय विभागाचे डॉ.एन.एम. खोडसकर, डॉ.आर.एम. महाजन, डॉ.ए.पी. वायरेकर, तालुका कृषी अधिकारी जी.के. चौधरी, मंडळ कृषी अधिकारी चंदन मेश्राम, सरपंच राखडे उपस्थित होते.काशिवार पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन आधुनिक शेती तंत्रज्ञानासोबत पूरक व्यवसायाकरिता विभिन्न योजना प्रामाणिकरीत्या राबवीत आहे. शेतकऱ्यांनी धानाच्या शेतीवर अवलंबून न राहता दुग्ध उत्पादन, फळबाग लागवड व इतर शेतीवर आधारित व्यवसायात सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. आ. काशिवार यांनी सांगितले की, भंडारा येथे नेस्ले कंपनीचा कारखाना उभाण्यात येणार आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या पीक विमा धोरणात सुधारणा करण्याचा प्रस्ताव हा विचाराधीन असून लवकरच शेतकरी हीत पिक विमा योजना अमलात आणल्या जाईल. जेणेकरून पिकांच्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यात लवकर मिळणे सोईस्कर होईल. याप्रसंगी डॉ.खोडसकर, डॉ.महाजन व डॉ.पाथरेकर यांनी उपस्थित शेतकरी व गौपालक यांना संकरीत गाईच्या संगोपन व दुग्ध व्यवसायासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.याप्रसंगी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत कोरडवाही क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून पशुधन गाय खरेदी केलेल्या २१ लाभार्थ्यांना ८ लक्ष ४० हजार रुपयाचे अनुदान निधीचे धनादेश आ.बाळा काशीवार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. प्रास्ताविकात चौधरी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की पीक हंगामापूर्वी उत्पादकता वाढविण्यासाठी गांभीर्याने विचार करूान नियोजितरित्या शेती करणे तसेच कृषी विभागाचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे. कार्यक्रमाचे संचलन कृषी सहायक एस.एन. नागलवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन चंदन मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमात बहुसंख्येने शेतकरी व गौपालक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शाश्वत शेती करण्याची गरज
By admin | Published: March 28, 2016 12:27 AM