लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पर्यावरण संतुलीत राहिले नाही, असे प्रत्येकजण बोलतो पण ते कशामुळे असंतुलीत झाले याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जैवविविधता जोपासणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील पर्यावरण व जैवविविधता अभ्यासक सुहास वायंगनकर यांनी केले.वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग प्रादेशिक, फ्लायकॅचर्स वाईल्ड फेंडस, अभियान फाऊंडेशन व आझाद शेतकरी संघटना यांचेवतीने शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित निसर्गावर बोलू काही या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सुहास वायंगनकर बोलत होते. ते पुढे म्हणाले पर्यावरणाचा तोल सांभाळत असलेल्या पश्चिम घाटात विकासाचे नावावर होत असलेल्या रस्ते, लोहमार्ग व कारखान्यामुळे पश्चिम घाटाची जैवविविधता धोक्यात आलेली आहे. अख्ख्या महाराष्ट्रात हे चित्र फारसे वेगळे नाही. चाळीस कोटी लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेल्या पश्चिम घाटातील ३३ टक्के वनस्पती नामशेष झालेल्या आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी जंगल आवश्यक आहे. परंतू केवळ १४ टक्के जंगल उपलब्ध आहे. एक जंगल तयार व्हायला झाडे चारशे ते एक हजार वर्षाचा कालावधी लागतो. मात्र आपण त्याला नष्ठ करण्याचा घाट घातलेला आहे. पशु, पक्षी, प्राणी व किटक यांचे अधिवास प्रचंड वेगाने नष्ट केल्या जात आहेत. नखशिखात फुले येणाऱ्या बहावा वनस्पतीसह कित्येक औषधी वनस्पती नामशेष होवू नये यासाठी लोकसहभागाची गरज आहे. मोठी उर्जा असणारा युवावर्ग या परिसरात असल्याने वनविभागाने त्यांचे सहकार्य घेवून जैवविविधता जोपासण्यासाठी प्रयत्न करावा, असे विचार त्यांनी व्यक्त केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विजय लेपसे, कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक वनपरिक्षेत्राधिकारी कोमल जाधव, सहायक वन संरक्षक शंकर धोटे, आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई, भाजपा किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र फुलबांधे, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिक लेपसे, संचालक वर्षा भोयर, कल्पना कटरे, अतिथी पश्चिम प्रशांत रायपुरकर यांनी तर आभार आशिष उरकुडे यांनी मानले. फ्लायकॅचर्स वॉईल्ड फ्रेंडस पवनीचे प्रवर्तक पंकज देशमुख व मित्रपरिवार यांनी फुलपाखरू उद्यान निर्मितीचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
जैवविविधता जोपासणे काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:10 PM
पर्यावरण संतुलीत राहिले नाही, असे प्रत्येकजण बोलतो पण ते कशामुळे असंतुलीत झाले याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जैवविविधता जोपासणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील पर्यावरण व जैवविविधता अभ्यासक सुहास वायंगनकर यांनी केले.
ठळक मुद्देसुहास वायंगनकर : पवनी येथे ‘निसर्गावर बोलू काही’ कार्यक्रम