कोंढा-कोसरा : वार्ताहर पवनी तालुक्यातील विरली (खंदार) गावात शासकीय जागेत स्मशानभूमीला लागून असलेल्या जागेत १५ ते २० दगडांचे गोलाकार वर्तुळात समाधी आहेत. त्यास मेनहीर (वृतसमाधी) तसेच त्यास शिलावर्तुळ असेदेखील म्हणतात. हे अवशेष महापाषाण काळातील असून, येते अशा शेकडो वृतसमाधी आढळतात. या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाने उत्खनन केल्यास अनेक प्राचीन अवशेष मिळू शकतात. हे अवशेष इतिहास पूर्व काळातील असल्याने यास विशेष महत्त्व प्राप्त होऊ शकते. मात्र महापाषाण काळातील हे ‘मेनहीर’ दुर्लक्षितच आहेत.
मागील वर्षात मार्च २०२० मध्ये येथे कडुलिंब वृक्षाला लागून असलेली बलदेवबाबा यांची पाषाणातील मूर्ती हे एक महापाषाण काळातील अवशेष असल्याचे स्पष्ट झाले. चंबुतऱ्यावर १४ फूट व जमिनीत ७ फूट खोल उत्खनन करून मिळाल्याने हे 'मेनहीर 'संपूर्ण भारतातील सर्वात मोठे असल्याची शक्यता वर्तविली होती, ती खरी ठरली आहे. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने येथील उत्खनन कार्य थांबविण्यात आले. नंतर पुन्हा येथे उत्खनन कार्य केले नाही. महापाषाण काळात मृतदेह पुरण्याची प्रथा होती. इ.स.पूर्व १००० च्या आसपासचा हा काळ आहे. विरली(खं.) येथे गोलाकार शिलावर्तुळ शेकडोंच्या संख्येने आहेत. येथील गोलाकार शिलावर्तुळाच्यामध्ये एक मोडा दगड असतो. ते गावकरी लोकांनी मोठया प्रमाणात काढून टाकले, तरी काही ठिकाणी अजून जसेच्या तसे आहेत.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे बलदेवबाबा यांची मूर्ती आहे. या मूर्तीला माना समाजाचे लोक आपले कुलदैवत मानून पूजाअर्चा करतात. बलदेवबाबा मेनहीर ही २१ फूट आहे. येथे पुरातत्व विभागाने उत्खनन केल्यास अनेक अवशेष मिळू शकतात. येथील स्मशानभूमीत शेड बांधकाम केले, त्यावेळी घराचे अवशेष मिळाले होते. यावरून येथे मानवी वसाहती अस्तित्वात होत्या. इ. स.पूर्व १००० मध्ये दक्षिण भारतात मानवीजीवन उत्तर भारताच्या तुलनेत विकसित नव्हते. तेव्हा ग्रामीण जीवन येथे अस्तित्वात होते. महापाषाण काळातील अवशेष पवनी तालुक्यात अनेक ठिकाणी मिळतात. पिंपळगाव (निपाणी), खैरी (तेलोता) येथे यापूर्वी शिलाप्रकस्थ मिळाले आहेत. त्यातील पिंपळगाव (निपाणी) येथील अवशेष पुरातत्व विभागाने आपल्या ताब्यात घेऊन तेथे अवशेषांचे सरंक्षण करण्यासाठी सुरक्षा भिंत तयार केली आहे.
विरली (खं.) खैरी (तेलोता) येथील अवशेषांना सुरक्षा भिंत बांधणे आवश्यक आहे. विरली (खं.) येथे शासकीय जागेत हे अवशेष पसरले आहेत. त्यांना संरक्षण देणे आवश्यक आहे. शिलावर्तुळ असलेल्या ठिकाणी उत्खनन केल्यास प्राचीन इतिहास पुन्हा उजेडात येऊ शकतो. तेव्हा लॉकडाऊन संपल्यानंतर येथील उत्खनन कार्य सुरू करणे गरजेचे आहे. मागीलवर्षी पुरातत्व विभाग, नागपूर डॉ. के. आर. के. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ संरक्षण सहायक हेमंत हुकरे यांनी उत्खनन कार्याकडे लक्ष दिले होते. परत थांंबलेले संशोधन कार्य सुरू करण्याची मागणी होत आहे.