भंडारा : जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात टुल्लू पंपाच्या माध्यमातून पाण्याचा अवैधपणे होणारा उपसा रोखण्यासाठी नवा प्रयोग केला जात आहे. येथे बुधवारपासून रोज सकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान लोडशेडिंग केले जाईल. पाण्याचे समान वितरण करता यावे यासाठी भंडारा शहरासह पवनी, तुमसर या शहरासाठी हा निर्णय असल्याने येथील नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागणार आहे.
कोळसा टंचाई आणि त्याच्या वाढत्या मागणीमुळे महाराष्ट्र आधीच लोडशेडिंगसोबत लढत आहे. अन्य राज्यांमध्ये तासांचे लोडशेडिंग सुरू आहे. मात्र, कोळसा संकट असतानाही महाराष्ट्राला लोडशेडिंगची झळ बसू दिली नसल्याचा दावा महावितरण सातत्याने करीत आहे; परंतु नव्या आदेशानुसार, आता भंडारा नगरपालिका क्षेत्रात तासभराचे लोडशेडिंग केले जाणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, भंडारा उपजिल्हाधिकाऱ्यांनी २९ एप्रिलला महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना पत्र लिहून भंडारा शहरातील गंभीर पाणी समस्येचा मुद्दा मांडला होता. नागरिक मोठ्या प्रमाणावर टुल्लू पंपाचा वापर करून पाण्याची चोरी करतात. यामुळे शहराच्या सर्वच भागांत समान पाणीपुरवठा करता येत नाही. यामुळे जनहित लक्षात घेता रोज सकाळी ७ ते ८ या वेळात लोडशेडिंग केले जावे, असे त्यांनी या पत्रात म्हटले होते. याला मुख्य अभियंत्यांची परवानगी मिळाल्याने २ मे रोजी अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहून भंडारा, पवनी, तुमसर या नगरपालिका क्षेत्रात सकाळी एक तासासाठी लोडशेडिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
निर्णय जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून : वासनिक
महावितरणचे मुख्य अभियंता बंडू वासनिक महणाले, जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या नगरपालिका क्षेत्रात जलसंकट आहे. टुल्लू पंपाद्वारे पाणी खेचणे बंद झाल्यास समान वितरण शक्य आहे. यापूर्वी देखील हा प्रयोग करण्यात आला आहे.
हा तर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
नागरिकांना पाण्याचे समान वितरण करण्याची जबाबदारी मनपा, नगर परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. नागरिक टुल्लू पंपाचा वापर करीत असतील तर ते थांबविण्याचा अधिकारही त्यांच्याकडे आहे. जप्ती, दंडवसुली असेही पर्याय आहेत. मात्र, आता वीज कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकीय दबावामुळे नागरिकांवर कारवाई करण्यात नगरपालिका असमर्थ असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे कारण यासाठी सूत्रांकडून दिले जात आहे.