अड्याळ : मोडकळीस आलेल्या पाटबंधारे विभागाच्या एका इमारतीत बिबट्याचा नवजात बछडा आढळल्याची घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पवनी तालुक्यातील चकारा येथे उघडकीस आली. या परिसरात बिबट्याचा संचार असून आता बछडा आढळला. वनविभाग दिवसभर मादी बिबटाचा शोध घेत असून परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.
अड्याळपासून काही अंतरावर पाटबंधारे विभागाची वसाहत आहे. काही वर्षापासून येथे कुणीच राहत नाही. या वसाहतीतील इमारती मोडकळीस आल्या आहेत. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास चकारा येथील विजय बोरसरे आपल्या मित्रासोबत शेळींचा चारा आणण्यासाठी या परिसरात गेला. झाडावरुन पाला तोडत असताना त्याला बिबट दिसला. त्यामुळे त्याची घाबरगुंडी उडाली. आपल्या मित्रासह तो गावात आला. ही माहिती सरपंचांना देण्यात आली. सरपंचांनी अड्याळ वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती दिली.
बिबटाच्या शोधात वनविभागाचे सहायक वनसंरक्षक वाय.बी. नागुलवार, वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे, क्षेत्र सहायक विनोद पंचभाई, वनरक्षक निंबार्ते, हटवार, कानसकर, कनवाडे आणि वनमजूर या वसाहतीत पोहचले. बिबट्याचा शोध घेत असताना एका पडक्या इमारतीत १५ दिवसांचे बिबट्याचा नवजात बछडा आढळून आला. वनविभागाने त्याला कुणालाही हात लावू न देता मादी बिबट येण्याची प्रतीक्षा सुरु केली. परंतु या परिसरात गर्दी झाल्याने मादी बिबट आलीच नाही. शेवटी या परिसरात दोन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.
बाॅक्स
बछड्याचा जन्म झाला कुठे?
पडक्या इमारतीत बिबट्याचा बछडा आढळून आला. या बछड्याचा जन्म येथेच झाला की आणखी कुठे? बिबट्याला एकच की दोन पिले असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान बिबट्याचा संचार या परिसरात असल्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.