लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी लगतच्या नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊ लागला आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरिएंटचे संकट घोंगावत आहे. गर्दी टाळण्यासाठी आता नवीन वर्षात लग्न समारंभ केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीतच पार पाडावे लागणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम नवर्षाच्या पूर्वसंध्येला आदेश निर्गमित केला.कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन नवीन व्हेरिएंटचा प्रसार अलीकडे अत्यंत वेगाने होत आहे. राज्यातही बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला नसून कोरोना रुग्णसंख्याही अत्यल्प आहे. मात्र, आगामी काळात काही दिवसांत लग्नसराई व इतर कार्यक्रमात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अधिक निर्बंध लागू केले आहेत. २५ डिसेंबर रोजी निर्गमित आदेशात बदल करून आता नव्याने निर्देश जारी करण्यात आले आहेत.विवाह समारंभ बंदिस्त असो की मोकळ्या जागेत कार्यक्रमात केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीलाच परवानगी राहणार आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमातही ५० व्यक्तींच्या मर्यादेतच परवानगी देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश लागू राहणार आहेत. त्यात सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, जीम, ब्युटी पार्लर, चित्रपटगृहे, नाट्यगृहामध्ये क्षमतेच्या ५० टक्के नागरिकांची उपस्थिती निर्धारित करण्यात आली आहे. क्रीडा स्पर्धांसाठी प्रेक्षक क्षमतेच्या २५ टक्के नागरिकांनाच उपस्थित राहता येणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून, सदर आदेश ३१ डिसेंबरपासून अमलात आला आहे.
अंत्यसंस्काराला २० आप्तस्वकीयांना परवानगी- अंत्यसंस्काराला आता २० व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत असेच निर्बंध अंत्यसंस्कारासाठी घालण्यात आले होते. आता पुन्हा नवीन वर्षात २० आप्तांच्या उपस्थितीचे बंधन राहणार आहे. यासोबतच इतर कार्यक्रमांवरही निर्बंध आणण्यात आले आहे. नागरिकांनी ओमायक्रॉन व्हेरिएन्टचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.