लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात बुधवारीही गारपिटीसह मुसळधार पाऊस बरसला. मात्र पवनी तालुक्यात गारपिटीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. या पावसाने रबी पिकांसह भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तालुका महसूल विभागाला सर्वेक्षण करण्याचे सांगितले असून सातही तालुक्यात नुकसान झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे धान मळणी करून शेतात ठेवलेले धानाची पोती, काही ठिकाणी कडपा ओल्या झाल्या आहेत. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी भाजीपालासह बागायत शेतीकडे लक्ष दिले होते त्यांनाही या गारपिटीचा फटका सहन करावा लागणार आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचा प्रामाणिकपणे सर्वेक्षण व पंचनामा तयार करून मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे. या पावसामुळे टमाटर, मिरची, कोबी पिकासह क्षेत्रात लागवड करण्यात आलेल्या लाखोळी, उळीद, मूग, वाटाना, पोपट, बरबटी, जवस, मोहरी, हरभरा, गहू, मका, सोयाबीन, करडई, धना व भाजीपालाचे पिकाचे नुकसान झाले आहे. लाखांदुरात वादळी पाऊसलाखांदूर : गत काही दिवसांपासून तालुक्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण व प्रचंड मोठ्या प्रमाणात धुके पडले असताना २८ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पाऊस झाला होता. मात्र या घटनेला दिवस लोटत नाही तोच सलग दुसऱ्या दिवशी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास झालेल्या गारपिटीसह वादळी पावसामुळे शेतकरी जनतेत भीतीचे वातावरण दिसून येत आहे. यंदाच्या खरीप व रब्बी हंगामांतर्गत शेतकऱ्यांनी तालुक्यातील एकूण १६ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रात विविध रब्बी पिकांची लागवड केली आहे. तथापि यंदाच्या खरीप अंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास २ हजार ३०० हेक्टर तूर पिकाची पेरणी तर १६ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रात लाखोळी, उडीद, मुंग, वाटाणा, पोपट, बरबटी, जवस, मोहरी, हरभरा, गहू, मका, सोयाबीन, करडई, धना व भाजीपाला यासह अन्य पिकांची पेरणी व लागवड करण्यात आली आहे. गत काही दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण व मोठ्या प्रमाणात धुके पडले असतांनाच २८ व २९ डिसेंबर रोजी वादळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकरी जनतेत भीतीचे वातावरण दिसून येत आहे. तथापि, सलग दुसऱ्या दिवशी तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील पेरणीपूर्ण पिकांवर मोठ्या प्रमाणात अळीसह अन्य कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून हजारो हेक्टरमधील रब्बी पिके नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वीज पडून गायीचा मृत्यूलाखांदूर : बुधवार दुपारच्या सुमारास शेतशिवारात चरत असलेल्या एका गाईवर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ४.३० वाजताच्या सुमारास घडली. नवनिता नवनाथ नाकाडे (४२) रा. दोनाड असे पीडित पशुपालकाचे नाव आहे. या घटनेत पीडित पशुमालकाचे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. भंडारा शहरातही मध्यरात्रीच्या सुमारास पाऊस बरसला. पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.
वीज कोसळून म्हैस व वासरू ठार- साकोली : २८ डिसेंबरच्या सायंकाळी मेघगर्जनेसह गारपीट झाली. साकोलीत शहरातील सेंदूरवाफा बिरसा मुंडा चौकातील अमित सिद्धार्थ शहारे श्रीनगर कॉलोनी प्रभाग क्र १ यांची म्हैस व तिचे वासरू वीज पडून ठार झाल्याची घटना रात्री ८.३० दरम्यान घडली. या गरीब शेतकऱ्याला शासनाकडून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे. शेतकऱ्याचे यात ७० हजारांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांस शासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी नगरसेवक रवी परशुरामकर, सिद्धार्थ शहारे, सदानंद परशुरामकर, मोरेश्वर चांदेवार यांनी केली आहे. पटवारी मेश्राम यांनी पंचनामा केला आहे.
पवनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस- पवनी : तालुक्यात गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. थोड्याच वेळात गारांचा वर्षाव सुरू झाला. पवनी शहरासह तालुक्यातील मांगली चौ., सावरला, भोजापूर मोठ्या प्रमाणात गारांचा वर्षाव झाला. तब्बल दहा ते पंधरा मिनिटांत रस्ते ,घरांचे छत व अंगणात गारांचा सडा पसरला. कौलारू घरांचे, शेतातील रब्बी पिकांचे व बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. वीस ते पंचवीस वर्षांत एवढ्या मोठ्या आकाराच्या गारांचा सडा नागरिकांनी पहिल्यांदाच पाहिला. गारांशी खेळून नागरिकांनी मौज लुटली.
लाखांदूर तालुक्यात ११४.३ मिमी पाऊस- मागील काही दिवसांपासून तालुक्याील सर्वच भागांत ढगाळ वातावरण दिसून येत होते. तथापि, तालुक्यातील काही भागात धुके पडल्याचीदेखील माहिती आहे. दरम्यान, मागील २८ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास तालुक्यात एकूण ११४.३ मिमी अवकाळी पाऊस झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यांत बारव्हा मंडळात १४.२मिमी, मासळ मंडळात १५.४ मिमी, विरली बु. मंडळात ३३.४ मिमी व लाखांदूर मंडळात ५१.३ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात सरासरी २८ मिमी पाऊस बरसला.