पालांदूर : कोरोना संकटाने क्रिकेट स्पर्धेसह इतरही मैदानी खेळ प्रभावित झाले असताना पालांदूर येथे तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागाने रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट सामने उत्साही वातावरणात गोविंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडले. नऊ दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेत प्रथम बक्षिसाचे मानकरी गुरढा येथील क्रिकेट संघ ठरला आहे, तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस अड्याळ संघाला मिळाले आहे. इतर बक्षीसमध्ये मॅन ऑफ द सिरीज ईश्वर साखरकर गुरढा, मॅन ऑफ द मॅच चेतन इसापुरे अड्याळ यांनी जिंकलेले आहे. बक्षीस वितरण सरपंच पंकज रामटेके पालांदूर, उपसरपंच स्वप्निल खंडाईत कवलेवाडा यांच्या उपस्थितीत पार पडले.
रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट सामन्यात एकूण ५५ संघाने हजेरी लावली. हे क्रिकेट सामने नऊ दिवस चालले. थंडीतही तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग क्रिकेट सामन्यात अनुभवायला मिळाला. भंडारा जिल्ह्यासह शेजारच्या इतर जिल्ह्यांतूनही क्रिकेट संघांनी हजेरी लावली होती.
बऱ्याच वर्षांनंतर पालांदूर येथे क्रिकेट सामने खेळण्यात आले. मैदानाची कमतरता असल्याने तरुणाईचा क्रिकेट खेळण्याकरिता हिरमोड होत आहे. सार्वजनिक क्रीडांगण सर्वसोईयुक्त नसल्याने तरुणाई ताटकळत आहे. पालांदूर येथे गोविंद विद्यालयाचे, पोलीस स्टेशनचे मैदान तरुणांना आकर्षित करीत आहेत. या मैदानांना आणखी सेवा पुरवीत सुसज्ज करण्याची गरज आहे. क्रिकेट सामन्याला श्याम चौधरी, अली मोहम्मद लद्दानी, विक्की यावलकर, सागर बोरकर, उमंग गायधनी, नितीन धकाते, आशिष सेलोटे, उमेर लद्यानी, पिंटू खंडाईत, पंकज रामटेके, अविनाश बावणे, अमोल पडोळे, सागर वंजारी, शुभम प्रधान, दिनेश तिजारे, अंकित राऊत, देवेश नवखरे, नीरज किदरले, देवानंद लांजेवार, अनुप खंडाईत, वसंता धकाते, आदी पीएमसीएल क्रिकेट मंडळाच्या तरुणांनी सहकार्य केले.