भंडारा : कोरोना संचारबंदीमुळे देशी-विदेशी दारू दुकानांसह बार आणि हाॅटेलही बंद आहेत. मद्यपींची मोठी अडचण होत असली तरी अनेकांनी त्यावर आता पर्याय शोधला आहे. शहरातील मोकळ्या मैदानावर रात्री मद्यपींची पार्टी रंगत असल्याचे दिसून येते. मैदानाच्या चोहोबाजूला रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास आणि वेफर्सची पाकिटे विखुरलेली दिसतात.
संचारबंदीमुळे सर्व ठप्प झाले आहे. देशी - विदेशी दारू दुकाने आणि हाॅटेल व बारही बंद आहेत. त्यामुळे मद्यपींना दारू मिळणे कठीण झाले. परंतु, आता यावर अनेकांनी पर्याय शोधला आहे. कुठूनतरी दारू मिळवायची आणि शहरातील एखाद्या मैदानात पार्टी रंगवायची, असा प्रकार सध्या सुरू आहे. भंडारा शहरातील गणेशपूर परिसरातील मिशन ग्राउंड परिसरात सकाळी फिरायला जाणाऱ्यांना मैदानात पडलेल्या रिकाम्या बाटल्या आणि प्लास्टिकचे ग्लास ओलांडूनच जावे लागते. मैदानाच्या तिन्ही बाजूला खच पडलेला दिसून येतो.
मद्यपी दारू मिळविल्यानंतर रात्रीच्या वेळी मोकळ्या मैदानात मैफल रंगवितात. तीन-चार मित्रांच्या संगतीत ही पार्टी रंगलेली असते. सोबत दारू आणि प्लास्टिकचे ग्लास असतात. पार्टी संपल्यानंतर त्याच ठिकाणी ते फेकून दिले जाते. मिशन ग्राऊंडसारखीच अवस्था शहरातील इतरही मैदानांची आहे. सध्या भंडारा जिल्ह्यात बारसमोर दारुविक्री केली जात आहे. मात्र दारुच्या मुळ किमतीपेक्षा अधिकची रक्कम वसूल केली जात आहे. त्यामुळे मद्यपींच्या खिशाला कात्री लागत आहे.