लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यातील एकही बालक पोषण आहाराविना वंचित राहू नये, त्यांच्यापर्यंत नियमित पोषण आहार पोहोचवा. महिलांवरील अत्याचारात तसेच घरगुती हिंसेवर नियंत्रण ठेवा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिले.जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिला व बालविकास विभागाच्या आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला आमदार नरेंद्र भोंडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसुंगे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी काठोळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र दरेकर, जिया पटेल उपस्थित होते.यावेळी महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, माहिला आर्थिक विकास महामंडळाचा आढावा सादरीकरणाद्वारे घेण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत माजी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ ११४२ लाभार्थ्यांना देण्यात आला असून त्यांना एक कोटी ३५ लाख २५ हजार रुपये वितरीत केले आहे. पोषण आहार अभियानांतर्गत आधारकार्ड सीडींग करण्याचे काम ९५ टक्के पुर्ण झाले असून जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. महिला अस्मिता योजनेचा लाभ देण्यातही जिल्हा प्रथम क्रमांकावरच असल्याबद्दल ना. यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले.जिल्ह्यात १३०५ अंगणवाडी केंद्र असून आदर्श अंगणवाडी केंद्राच्या इमारतीसाठी ५३ लाख निधी मंजूर आहे. एक रकमी लाभाची रक्कम अंगणवाडी सेविका व मदतनिसाच्या खात्यात थेट जमा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत असून आरोग्य तपासणीसह जनजागृती करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले.कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊल उचलून अमंलबजावणी केल्याचे ना. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
महिला अत्याचारात चूक करणाऱ्यांना माफी नाहीमहिला व अल्पवयीन मुलीवर अत्याचारासंदर्भात चूक करणाऱ्यांना कदापी माफी नाही. अपराध्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. शाळा महाविद्यालयात पास्को ई-बॉक्स लावण्याची सूचना संबंधिताला देण्यात आल्याच्याही त्या म्हणाल्या. अंगणवाडी सेविकांना नियमित वेतन आणि वेतनवाढ देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. बालकातील व्यसनाधिनता वाढीस लागली असून त्यासाठी समाजालाच पुढे यावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. कोरोनामुळे शाळा सुरु होण्यास वेळ लागत असून आॅनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे.