भंडारा : कोरोना संसर्गाने ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आली असताना निसर्गाचे दुष्टचक्रही शेतकऱ्यांच्या पाठीशी लागले आहे. दिवाळी अगदी एक दिवसावर आली असतानाही गावखेड्यात उत्साहच दिसत नाही. शेतकरी शेतातच राबत असून, पैशाची तजवीज करताना नाकीनव येत आहेत.
भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. दिवाळीचा सण हा धानपिकावर साजरा केला जातो. परंतु गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गत दीड वर्षात तर कोरोनाने संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. कुणाच्याही हातात पैसे नाही. गावखेड्यातून शहरात रोजगारासाठी गेलेले गावात रिकामे बसून आहेत. अशा स्थितीत दिवाळी साजरी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. धान विकून पैसे आणावे तर व्यापारी अत्यल्प दरात धान खरेदी करीत आहेत. आधारभूत केंद्रावर धान द्यावा तर वेळेवर पैसे मिळण्याची शक्यता नाही. अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे.
पूर्वी दिवाळी म्हणजे गावात उत्साहाचे-आनंदाचे वातावरण असायचे. पाच दिवस दिवाळी म्हणजे आनंदाची पर्वणी असायची. नवीन वस्तूंसह कपड्यालत्त्यांची खरेदी व्हायची. घरांची रंगरंगोटी केली जायची. परंतु आता हे सर्व चित्र बदलले आहे. दिवाळी अगदी एक दिवसावर आली तरी शेतकरी आजही धान कापणीसाठी शेतातच राबताना दिसत आहे. कुणाच्याही चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद दिसत नाही.
आठवडी बाजारातही गर्दी दिसेना
ग्रामीण भागात खरेदीचे हक्काचे ठिकाण म्हणजे आठवडी बाजार. दिवाळीपूर्वीचा आठवडी बाजार म्हणजे वर्षातील सर्वांत मोठा बाजार. प्रत्येक वस्तू खरेदी करण्याचा या बाजारात ग्रामीण जनतेचा कल असतो, परंतु शेतकरी आणि शेतमजुरांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. गत आठवडाभरापासून जिल्ह्याच्या विविध ठिकाणी असलेल्या आठवडी बाजारात हवी तशी गर्दीच झाली नाही.