इंद्रपाल कटकवारभंडारा : दहा निरागस बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर शासन, प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एकेक करीत रुग्णालयातील हलगर्जी चव्हाट्यावर येत आहे. अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर फायर ऑडिटचा मुद्दा समोर आला असला तरी त्यासोबतच इतर अन्य बाबीही नकारात्मकच आहेत. ना फायर ऑडिट, ना फायर हायड्रन्ट अन् सुरक्षेची कोणती हमीही नाही, अशीच अवस्था दिसत आहे. या घटनेने जिल्हा रुग्णालयाची लक्तरे देशपातळीवर टांगली गेली असून, विभागनिहाय ऑडिटचा मुद्दाही आता पुढे येत आहे. विशेष म्हणजे दशकभरात या रुग्णालयाचे कितीवेळा फायर ऑडिट झाले याची शहानिशा करणे महत्त्वाचे आहे.
अंतर्गत विभागाचे ऑडिटही संशयाच्या भोवऱ्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध विभाग आहेत. त्यात दंतरोग विभाग, नेत्रविभाग, शस्रक्रिया विभाग, आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग असे महत्त्वपूर्ण विभाग आहेत. या विभागांचे वर्षनिहाय ऑडिट होणे आवश्यक असते. फायर ऑडिटही त्यातीलच एक प्रकार आहे. परंतु अंतर्गत विभागाचेही असे कोणतेच ऑडिट झाले नसल्याची बाब पुढे आली आहे.
...तर १० चिमुकल्यांचे जीव वाचले असतेn ४०० खाटांचे रुग्णालय असलेल्या या परिसरात किती वेळा फायर ड्रील झाली, याची माहिती कुणाकडेच नाही. खरे तर एकदाही फायर ड्रील झाली नाही, असे दबक्या आवाजात सांगितले जाते. फायर हायड्रन्ट आणि स्मोक अलार्म यंत्रणाही येथे कार्यान्वित नाही. यापैकी कोणतीही एक यंत्रणा असती तर त्या दहा चिमुकल्यांचे प्राण वाचले असते. n कोवळी पाखरे उमलण्यापूर्वीच कोमेजली. याला जबाबदार कोण, याचा शोध उच्चस्तरीय समिती घेत आहे. त्यातून खरे कारणही पुढे येईल, दोषींना शिक्षाही होईल; परंतु त्या निरागस बालकांचे जीव परत मिळणार नाही.