भंडारा : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात आली आहे. यामुळे शाळा सुरू करण्यास निर्माण झालेले वातावरण बघून राज्य शासनाने स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, जिल्ह्यातही वर्ग ८ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिल्याने आजघडीला जिल्ह्यातील २९५ पैकी २९२ शाळांची घंटा वाजली आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थीच कोरोनाबाधित निघाल्याने शाळाच बंद करण्याची वेळ आली आहे. मात्र सुदैवाने जिल्ह्यात असा प्रकार घडलेला नाही. जिल्ह्यात सुरू झालेल्या २९२ शाळा सुरू झाल्यानंतर त्यातील एकही शाळा आतापर्यंत बंद करण्याची वेळ आलेली नाही. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या शून्य आहे.
बॉक्स
एकही शाळा बंद नाही
राज्य शासनाच्या आदेशानुसार पालकांची परवानगी घेऊन जिल्ह्यातील २९२ शाळा सुरू करण्यात आल्या असून त्यातील एकही शाळा बंद झाली नाही.
शाळा सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील ७०८८६ पालकांनी संमती दिली असून त्यानुसार शाळा सुरू आहेत. यात भंडारा शहरासह तुमसर तालुक्यातील सर्व शाळा सुरू असल्याचे दिसत आहे. लाखांदुरात हे प्रमाण कमी आहे.
कोट
मागील वर्षापासून शाळा बंद असल्याने मुले घरात कोंडून होती. घरात राहून त्यांना कंटाळा आला होता. शिवाय ऑनलाइनमध्ये हवा तसा अभ्यास होत नव्हता. आता शाळा सुरू झाल्याने मुले अभ्यास करीत असून त्यांना घराबाहेरही पडता येत आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी अजूनही थोडा धोका कायम आहे.
- देवराव गिरीपुंजे, पालक
कोट
शाळा सुरू झाल्याने आता घराबाहेर पडता येत आहे. नाहीतर मागील वर्षापासून घरातच राहावे लागत होते. आता अभ्यासही होत असतानाच मित्रांसोबतही भेटता येत आहे. मात्र पालक अद्यापही शाळेत पाठविण्यास तयार नाहीत, त्यामुळे अडचण होते.
- उमेश वाहणे, विद्यार्थी