कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा बंदच होत्या. पण पहिली लाट ओसरल्यानंतर पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. पण अनेक पालकांनी संसर्ग लक्षात घेता, आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती ही अल्पच होती. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरलेच नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना गत दीड वर्षापासून शाळेचे आणि शिक्षकांचेसुद्धा दर्शन झालेच नाही. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ७९४, अनुदानित ३४१ आणि विनाअनुदानित १५८ शाळा आहेत. या शाळांमध्ये दोन लाखांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील वर्ष कोरोनामुळे तसेच गेले. त्यामुळे शासनाने या विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. हा उपक्रम शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरत असला तरी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अडचणीचा ठरत असल्याने या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून उत्तीर्ण केले जाणार आहे.
बॉक्स
शहर आणि गावात असे होते शिक्षण...
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा कमी आणि नुकसान अधिक झाले आहे. शहरी भागात सर्व सुविधा असल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यास केला. मात्र ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्क आणि ॲन्ड्राॅइड मोबाइलची समस्या यामुळे गरीब विद्यार्थी अभ्यासापासून दूर राहिला. ऑनलाइन अभ्यासामुळे त्यांना बराच अभ्यासक्रम लक्षातदेखील आला नाही. त्यातच आता मागील वर्गातील अभ्यासक्रम समजला नसताना पुढील वर्गात वर्गोन्नत केल्याने त्यांना अभ्यासात अडचणी निर्माण होणार आहेत, तर अजूनही यंदा नवीन शैक्षणिक सत्र केव्हा सुरू होते, हे निश्चित सांगता येत नाही.