भंडारा : शहरालगतच्या गणेशपूर, पिंडकेपार शिवारात पग मार्क आढळल्यापासून चार दिवसात कुणालाही वाघाचे दर्शन झाले नाही की कुण्या प्राण्याची शिकारही झाली नाही. कधी माकडांचे कॉलिंग तर कधी रानडुकराची शिकार झाल्याच्या माहितीवरून वन विभागाकडून गावकऱ्यांच्या मदतीने परिसर पिंजून काढला जातो. वाघ टेकपार जंगलातून आल्याची माहिती असून, तो सध्या कुठे आहे, याची कोणतीही माहिती नाही. मात्र, परिसरातील गावांमध्ये कमालीची दहशत आहे. गत शनिवारी गणेशपूर शिवारातील साठवणे यांच्या शेतात ढाण्या वाघाचे पग मार्क आढळून आले होते. परिसरात वाघ आल्याची माहिती मिळताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांच्या मदतीने गत चार दिवसांपासून वाघाचा शोध घेतला जात आहे. वन विभागाने तीन ट्रॅप कॅमेरे परिसरात लावले आहेत. मात्र, त्यातही वाघाचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे वाघ नेमका कुठे गेला असावा, याचा अंदाज येत नाही. दरम्यान, मंगळवारी सिरसघाट परिसरात वाघ असल्याची माहिती पुढे आली. दिवसभर वाघाचा शोध घेण्यात आला. मात्र, कुठेही साधे पग मार्क दिसले नाहीत. गत तीन दिवसांपासून वाघाबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. पिंडकेपार, गणेशपूर, काेरंभी परिसरात दहशत दिसत आहे.
गणेशपूर शिवारात आलेला वाघ टेकेपार जंगलातून आला असावा, असा अंदाज आहे. टेकपार उपसा सिंचन केंद्र परिसरातून वैनगंगा नदी पार करून तो गणेशपूर पाणी पुरवठा योजनेजवळ सर्वप्रथम आल्याच्या पाऊलखुणा दिसून येतात. त्यानंतर हा वाघ दवडीपार जंगलातून पिंडकेपार शिवारात शिरला असावा, असे काहीजण सांगतात. पाणी पुरवठा योजनेच्या पश्चिम दिशेला २०० मीटर अंतरावर वाघाच्या पहिल्या पाऊलखुणा दिसत आहे. वाघ कुणालीही दिसला नसला तरी दररोज वाघाच्या दर्शनाच्या अफवा पसरत असून, परिसरात कमालीची भीती निर्माण झाली आहे.