साकोली (भंडारा) : आठ वर्षीय चिमुकलीला ठार मारून तणसाच्या ढिगाऱ्यात जाळणाऱ्या आरोपींचा दोन दिवस झाले तरी थांगपत्ता लागला नाही. पोलिस आरोपींचा शोध घेत असून गुरुवारी पोलीस अधीक्षक लोहित मतानी साकोली तालुक्यातील पापडा येथे तळ ठोकून होते.
श्रद्धा किशोर सिडाम (८) रा. पापडा, ता. साकोली या चिमुकलीचा जळालेल्या अवस्थेत बुधवारी सकाळी शेतातील तणसाच्या ढिगाऱ्यात मृतदेह आढळला होता. सोमवारी सायंकाळी बाहेर खेळायला गेल्यानंतर ती बेपत्ता होती. बुधवारी मृतदेह आढळल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. विविध पैलूने या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी बुधवारीच पापडा गावाला भेट दिली होती. दरम्यान, गुरुवारी ते गावात तळ ठोकून आहेत. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण, साकोलीचे ठाणेदार जितेंद्र बोरकर आरोपींचा शोध घेत आहेत. काही व्यक्तींचे बयाण पोलिसांनी नोंदविल्याची माहिती आहे.
चिमुकलीला ठार मारले, तणसाच्या ढिगाऱ्यात जाळले
श्रद्धाचा खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला हे दुसऱ्या दिवशीही गुलदस्त्यात होते. या घटनेने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. विविध सामाजिक संघटनांनी प्रशासनाला निवेदन देऊन श्रद्धाच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
मध्यरात्री श्रद्धावर अंत्यसंस्कार
बुधवारी सकाळी जळालेल्या अवस्थेत श्रद्धा सिडाम हिचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. मध्यरात्रीच्या सुमारास पापडा येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी प्रत्येकजण हळहळ करीत होता.