भंडारा : तालुक्यातील खुटसावरी येथील समता एकता नगरवासी गत ४० वर्षापासून जमीन मालकी हक्काचे पट्टे मिळण्याबाबत शासन प्रशानाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांना अद्यापर्यत मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले नसल्याने समता एकता नगरवासी संतप्त झाले आहे.
ग्रामपंचायत कार्यालय खुटसावरी अंतर्गत असलेल्या समता एकतानगरवासी गत ४० ते ४५ वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. सध्या या नगरामध्ये जवळपास ८० कुटुंब जीवन जगत आहेत. याठिकाणी स्वस्त धान्य दुकान, अंगणवाडी केंद्र, हनुमान मंदिर यांच्यासह अनेक कुटुंबाला सरकारच्या शासकीय योजनेतून घरकूल बांधकामदेखील मिळालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राजस्व विभागांतर्गत असलेल्या सातबारावर भूमापन क्रमांक व उपविभाग ९७ अंतर्गत एकूण क्षेत्र ५.३२ हेक्टर आर चौरस मीटर आहे. कुळखंड व इतर अधिकारातंर्गत सदर गट निस्तार व चराईकरीता मुकरर म्हणून उल्लेख आहे. या ठिकाणी कोणतेही जंगल नाही. गत ४० वर्षांपासून येथे अनेकांचे पक्के बांधकाम असून एक गावच तयार झालेला आहे. सर्व शासकीय योजना मिळत असताना त्यांना अद्यापर्यत जमीनीचे मालकी हक्काचे पट्टे मिळाले नाही.
समता एकता नगर येथील जवळपास १४० मतदार मतदानाचा हक्क बजावतात. मात्र त्यांना निवडणूक रिंगणात उभे होता येत नाही. जर उभे झाल्यास अपात्रतेची टांगती तलवार दाखवून धमकावले जाते. सरकारकडून अनेकदा विविध शासकीय जमिनींवर अनेक वर्षापासून अतिक्रमण करून असलेल्या रहिवाशांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचे आश्वासन दिले जाते. ४० वर्षांपासून मालकी हक्काच्या पट्ट्यासाठी३० ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित ग्रामसभेत ठराव घेण्यात आलेला आहे. यासंबधीचे निवेदन खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आलेले आहे. मात्र यावर कोणतीच उपाययोजना न झाल्याने समता एकता नगरवासींयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
समता एकता नगरवासीयांना तातडीने जमिनीचे पट्टे द्यावे, यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेतला आहे. त्याचा प्रशासनाकडे नियमित पाठपुरावा सुरु आहे. राज्य शासनाकडे तसे निवेदन पाठविले आहे. -संदीप खंडाते, सरपंच, खुटसावरी.
समता एकतानगरात गत ४० वर्षापासून अनेक कुटूंब वास्तव्यास आहे. मात्र अद्यापही जमीनीचे पट्टे मिळाले नाही. पट्टे मिळावे, यासाठी नेहमीची लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदने देण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.- रवींद्र वासनिक, समता एकता नगरवासी.
सरकारकडून अनेकदा विविध शासकीय जमिनींवर अनेक वर्षापासून अतिक्रमण करून असलेल्या रहिवाशांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अनेक वर्षांपासून आमचे वास्तव्य असतानाही अद्यापही पट्टे मिळाले नाही. जिल्हाधिकारी महाेदयांनी याकडे लक्ष देऊन जमिनीचे पट्टे मिळविण्यासाठी सहकार्य करावे. -अरुण मांढरे, समता एकता नगरवासी.