वरठी : परीक्षा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अनेक आव्हानाला सामोरे जावे लागते. शालेय परीक्षाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षा नुसत्या परीक्षा नसून जीवन जिंकण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांनी केले.
नवप्रभात हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित मुख्याध्यापकाच्या सभेत ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपशिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये हे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य कमल कटारे व मुख्याध्यापिका सुवर्णा पाठक उपस्थित होते. शालेय शिक्षणात इयत्ता ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येतात. शालेयस्तरावर आयोजित या परीक्षांना स्पर्धा परीक्षेचे स्वरूप आले आहे. शालेय जीवनात अशा परीक्षेत सहभाग घेतल्यास विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची खरी ओळख होऊ शकते. शालेय जीवनात या स्पर्धा परीक्षा पर्वणीप्रमाणे असून विद्यार्थ्यांना ध्येय ठरवण्यासाठी कामी पडू शकते, असे उपशिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांनी केले.
गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांनी तालुक्यातील मुलांना स्पर्धा परीक्षांची जाणीव निर्माण होऊन त्यात आवड निर्माण करण्यासाठी तालुक्यात हा उपक्रम सुरू केला आहे. तालुक्यातील इयत्ता ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांकरिता त्यांनी परीक्षा फीस भरण्यापासून ते मोफत पुस्तके वाटप करण्याचे संपूर्ण नियोजन केले आहे. यासाठी शाळास्तरावर शिक्षकांनी पुढाकार घेऊन नियमित वर्ग घेण्याबरोबर सराव परीक्षेचीही तयारी केली आहे. जिल्ह्यातील या अभिनव उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.
शिक्षक व पालकांनी यात आपले थोडेसे शैक्षणिक श्रम लावून योजना यशस्वी करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांनी केले. सूत्रसंचालन केंद्रप्रमुख रविशंकर बिसने यांनी केले तर मुख्याध्यापक श्रीकांत सार्वे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रकाश वैरागडे, के. जी. साखरे, बी. बी. भिवगडे, किशोर लांजेवार, माधवी नंदनवार आदी उपस्थित होते.