भंडारा : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे आणि खत खरेदी करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून कृषी केंद्रांना आता सर्व दिवस दुकाने उघडे ठेवण्याची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. आता सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कृषी केंद्र सुरू राहणार आहेत.
जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे ‘ब्रेक द चेन’ची अंमलबजावणी करण्यात येत होती. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंसह कृषीनिविष्ठा विक्री दुकानांना दुकाने उघडण्याची परवानगी दिली. परंतु कृषी केंद्रांची वेळ शेतकऱ्यांच्या सोयीची नव्हती. आगामी खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कृषी केंद्रात बियाणे व खत खरेदीसाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कृषी केंद्राच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व कृषी केंद्र सातही दिवस सुरू राहणार असल्याचे आदेश देण्यात आले आहेत.