नवीन हंगामाची सुरुवात होऊनही मागील खरीप हंगामाच्या धानाचे बोनस अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाही. सहा महिन्यांचा कालावधी लोटला असल्याने आतातरी बोनसची रक्कम द्यावी, अशी सर्वस्तरावरून शेतकऱ्यांची मागणी होत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मागील वर्षी आघाडी सरकारने धानाला ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस जाहीर केला होता. हा बोनस शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचा आहे, परंतु मागील खरीप हंगामाचे धान विकून सहा महिने लोटले तरीही बोनसची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले असून आता नवीन खरीप हंगामाच्या खर्चासाठी शेतकऱ्यांना सावकाराकडे तथा बँकांचे दार ठोठवावे लागत आहे. यापूर्वी राज्य शासनाने प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान जून २०२० अखेर कर्ज भरणाऱ्यांना देण्याची घोषणा केली होती. जवळपास वर्ष लोटले असून अद्याप शासनाकडून प्रामाणिक शेतकऱ्यांबाबत निर्णय घेतलेला नाही. प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचा शासन मुहूर्त कधी काढणार ? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गात जोर धरू लागला आहे.
भंडारा जिल्ह्यात १ लाख २७ हजार ६२४ शेतकऱ्यांनी ३१ मार्चअखेर विविध आधारभूत केंद्रावर धानाची विक्री केली आहे. धानाचे हमीभाव व सातशे रुपये बोनस मिळून प्रतिक्विंटल अडीच हजार रुपयांचा दर मिळाला असल्याने जिल्ह्यातील शेतकरी आनंदात होते. परंतु आता सहा महिने नंतरही ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनसची रक्कम न मिळाल्याने शेतकरी चातकासारखी वाट पाहून पाहून थकले आहेत. तरी तत्काळ बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळते करण्याची मागणी भाजपचे युवा नेते किशोर रहांगडाले यांनी केली आहे.