लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी /मोठी : खासगी वाहनातून दारूची तस्करी होत असताना आता तस्करांनी बसमधूनही दारूचे वहन करणे सुरू केले आहे. मात्र बुधवारी गुप्त माहितीच्या आधारे दिघोरी पोलिसांनी साकोली-चंद्रपूर बसची झडती घेत दोन महिलेसह एका इसमाला दारू साहित्यांसह पकडले.साकोली ते चंद्रपूर एम एच ४० वाय ५३९६ क्रमांकाच्या बसमध्ये अवैधरित्या दारुची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती दिघोरी पोलिसांना मिळाली. पोलीस ठाणे दिघोरी समोर नाकेबंदी करुन सदर बसला थांबविण्यात आले. स्थानिक पंचाच्या समक्ष पोलिसांनी बसची तपासणी केली असता बसमध्ये तीन प्रवाशांची संशयास्पद हालचाल दिसून आली. त्यांना त्यांच्या बॅगमधील सामान दाखविण्याबाबत बोलले असता जवळपास लहान मोठ्या १२ बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी मद्याच्या लहान आकाराच्या बाटल्या आढळून आल्या. लगेच तीन्ही आरोपींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यामध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश होता.महिलांमध्ये ज्योती शेषपाल मेश्राम (३०) रा. चंद्रपूर यांच्या सामानाची झडती घेतली असता. त्यामध्ये ४०० नग ९० मिली रॉकेट देशी दारुचे एकुण दहा हजार ४०० रुपये किमतीची जप्त करण्यात आली. दुसरी महिला माधवी उमेश मेश्राम (३१) रा. भिवसनटोला (ता. साकोली) हिच्याजवळून ४५० नग ९० मिली रॉकेट देशीदारुच्या ११७०० रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आले. तर तिसरा आरोपी निशांत इश्वरदास डोंगरे (३०) रा. गोंदिया यांचे जवळून २४ नग १८० मिली विदेशी ३३६० रुपयांची हस्तगत झाली.गडचिरोली व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यात दारुबंदी असल्याने भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून दारु तस्कर विविध मार्गाचा व साधनांचा अवलंब करुन दारुची अवैध तस्करी करुन मोठा नफा मिळवित असतात. दारुच्या अवैध तस्करीसाठी राज्य शासनाची बस सगळ्यात सोयीचा मार्ग असल्याचे या या दारु तस्करानी हेरले असावे. याआधी सुध्दा बसमधून मोठ्या प्रमाणात दारुची अवैध वाहतुक झाली असावी यात शंका नाही. तसेच या दारु तस्करीमध्ये चालक व वाहक यांचाही समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस निरीक्षक वकेकार, पो. शिपाई शेन्डे, पुराम, हटवार यांनी योग्यप्रकारे सापळा रचून तिन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली असता लोकांनी ठाण्यासमोर एकच गर्दी केली. तपास ठाणेदार गावंडे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
आता एसटी बसमधूनही दारुची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 9:45 PM
खासगी वाहनातून दारूची तस्करी होत असताना आता तस्करांनी बसमधूनही दारूचे वहन करणे सुरू केले आहे. मात्र बुधवारी गुप्त माहितीच्या आधारे दिघोरी पोलिसांनी साकोली-चंद्रपूर बसची झडती घेत दोन महिलेसह एका इसमाला दारू साहित्यांसह पकडले.
ठळक मुद्देतीन जणांना अटक : साकोली-चंद्रपूर बसमधील प्रकार, दिघोरी पोलिसांची कारवाई