लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात १७ पोलिस ठाणे कार्यरत आहेत. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास जाणाऱ्या महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी, याकरिता महिला मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना यापूर्वी राज्य शासनाने दिल्या आहेत. त्या सूचनांचे पालन पोलिस खात्याकडून होत आहे. सर्वच ठाण्यांत पोलिसांचा सखी डेस्क महिलांच्या मदतीला धावत आहे. आता कुठल्याही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होते. ऑनलाइन तक्रार संबंधितांकडे पाठविली जाते.
पोलिस ठाण्यात महिला पथक आणि महिला कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी समुपदेशन केले जाते. त्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याचा प्रयत्न होतो. मागील काही वर्षामध्ये महिलांच्या विविध प्रकारच्या तक्रारी वाढल्या आहेत. शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ, अत्याचार, विनयभंग किंवा विविध प्रकारच्या किरकोळ घटना, मारहाण, वाद, भांडण, तंटे अशा प्रकारच्या तक्रारी घेवून महिला तक्रारीसाठी पोलिस ठाणे गाठत असतात. पोलिस अधीक्षक कार्यालयअंतर्गत कार्यरत असलेल्या डायल ११२ यंत्रणेवरसुद्धा या महिलांना संबंधित तक्रार देता येते. महिलाना त्यांच्या रहिवास क्षेत्रातील घराजवळ असलेल्या ठाण्यात रीतसर अर्ज, तक्रार नोंद करता येते.
महिला तक्रारदारांसाठी प्रत्येक ठाण्यात सखी डेस्ककेंद्र शासन व राज्य शासन गृह विभाग यांच्यावतीने महिलांच्या विविध प्रकारच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्यासाठी व त्यांची दखल घेण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी सर्व पोलिस अधीक्षक कार्यालयांना सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार महिला तक्रारदारांसाठी प्रत्येक ठाण्यात सखी डेस्क स्थापन करण्यात आले आहे. पती-पत्नीतील वादविवाद सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न होतो.
महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून
- महिला मदत कक्ष: स्वतंत्रपणे महिलांसाठी मदत कक्षसुद्धा स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक ठाण्यात कर्मचारी नियुक्त केले आहेत. महिलांचे प्रश्न हे महिलांना सांगता यावेत, त्याचे अर्ज आणि शंकांचे निरसन होण्याकरिता महिला कर्मचारी, अधिकारी संवाद साधतात.
- दामिनी पथक : शहरांतील बाजारपेठेत, शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणे, जेथे महिलांची वर्दळ असते, अशा परिसरात महिलांना त्रासाला सामोरे जावे लागू नये, याकरिता दामिनी पथक कार्यरत आहे. या पथकाकडून गस्त घालून टवाळखोरांविरुद्ध किंवा छेडछाड प्रकरणात कारवाई करून महिलांना मदत मिळवून दिली जाते