१८ वयोगटातील मुले ठरणार लाभार्थी : १०४ प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत होणारभंडारा : गंभीर आजार व त्यावरील वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार व्हावे, यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य आरोग्य योजना राबविली जाते. ही योजना केशरी व पिवळे रेशन कार्डधारकांसाठीच होती. गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या या योजनेचा फायदा यापुढे पांढऱ्या रेशनकार्डधारकांना म्हणजेच श्रीमंतांनासुद्धा होणार आहे.या योजनेमध्ये ० ते १८ वयोगटातील मुले लाभार्थी ठरणार आहेत. या नव्या योजनेंतर्गत १०४ प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम अंतर्गत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील रुग्णालयासोबतच हा सामंजस्य करार झाला असून, ही योजना लवकरच राज्यात लागू होणार आहे. दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) व दारिद्र्यारेषेवरील (एपीएल) नागरिकांच्या जटिल आजारांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी शासनाने २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात 'राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना' सुरू केली. या योजनेत जटिल शस्त्रक्रियांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येते. यात ३० प्रमुख शस्त्रक्रियांसह तब्बल ९७२ शस्त्रक्रियांचा समावेश आहे. ही योजना पांढऱ्या रेशनकार्डधारकांसाठी नव्हती; मात्र लहान मुलांमध्ये वाढते गंभीर आजार लक्षात घेता शासनाने ही योजना व्यापक करण्याचे उद्देशाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाभार्थी वाढणार आहे. राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांमध्ये लाभार्थींच्या गरजेनुसार १०४ प्रकारच्या शस्त्रक्रिया होणार आहेत.यापैकी केशरी व पिवळ्या रेशनकार्डधारकांसाठी ३७ शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत उपलब्ध होत्या. आता यात लहान मुलांच्या संदर्भातील ६७ शस्त्रक्रिया जीवनदायी योजनेंतर्गत असलेल्या रुग्णालयांमधून केंद्र शासनाच्या दरानुसार करण्यात येणार आहेत. यासाठी लागणारा निधी राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)
आता शुभ्र कार्डधारकांनाही मिळणार 'जीवनदायी'चा लाभ
By admin | Published: June 04, 2015 12:29 AM