देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गॅस सिलिंडरचे दर बुधवारी आणखी २५ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. यामुळे आता घरगुती वापराचा १४ किलोचा सिलिंडर ९४६ रुपयांचा झाला असून सातत्याने होत असलेली दरवाढ बघता गृहिणी चांगल्याच संतापल्या आहेत. पेट्रोल-डिझेलसोबतच अन्य वस्तूंची वाढत चाललेली महागाई आता सर्वसामान्यांना चांगलीच होरपळत आहे.अशात गॅस सिलिंडर भडकल्याने आता गॅस सोडून चुलीवर स्वयंपाक करायची पाळी गृहिणींवर आली आहे. विशेष म्हणजे, सिलिंडरच्या दरवाढीमुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी पुन्हा चूल पेटविण्यास सुरुवात केली आहे. मात्र शहरात ते शक्य नसल्याने आता फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या काय, असा सवाल संतापलेल्या गृहिणी करीत आहेत. वर्षभरापासून सातत्याने महागाई वाढत चालली असून सोबतच गॅस सिलिंडरचे दर त्यामुळे भरमसाट वाढले आहेत. सिलिंडर आता हजार रुपयांच्या घरातच पोहोचल्याने सर्वसामान्यांनी सिलिंडर कसा खरेदी करायचा, असा प्रश्न पडत आहे. महागाई नियंत्रणात आणणे गरजेचे आहे.
सबसिडी किती भेटते रे भाऊ
- घरगुती वापराच्या सिलिंडरवर ग्राहकांना शासनाकडून ४६ रूपये सबसिडी दिली जाते. मात्र या तुलनेत सिलिंडर ९३० रुपयांवर पोहचले होते. आता बुधवारी त्यात आणखी २५ रूपयांची वाढ झाली असून सिलिंडर ९४६ रूपयांवर पोहचले आहे. म्हणजेच, सिलिंडरचे दर आवाक्याबाहेर जात असतानाच त्यावर दिली जाणारी सबसिडी मात्र अत्यंत मोजकीच आहे.
व्यावसायिक सिलिंडरही महागले - घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर भडकले असतानाच व्यावसायिक सिलिंडरचे दर सुद्धा वाढविण्यात आले आहेत. सध्या १,७९७ रूपयांचा असलेला व्यावसायिक सिलिंडर ७० रूपयांनी महागला असून त्याची किंमत आता १,८६७ रूपये झाली आहे. परिणामी एकीकडे गृहिणी संतापलेल्या असतानाच व्यापारीही सिलिंडर दरवाढीमुळे चांगलेच त्रस्त झाले असून त्यांच्यातही रोष दिसून येत आहे.
महिन्याचे गणित कोलमडले लॉकडाऊनने अगोदरच सर्वसामान्य अडचणीत आले आहेत. त्यात सातत्याने महागाई वाढत असून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची दरवाढ झाल्याने आता सिलिंडर ९५५ रुपयांना मिळणार आहे. सततच्या महागाईने आता घर चालविणे कठीण झाले आहे. शासनाने महागाई नियंत्रणात आणून सिलिंडरचे दरही कमी करावे. - प्रियंका दुधबरैय्या (गृहिणी)
उज्ज्वल भविष्यासाठी सुरू केलेली योजना सिलिंडरच्या सततच्या दरवाढीने मातीमोल ठरली आहे. सिलिंडरचे दर ९५५ रूपये झाले असून ते आता आवाक्याबाहेर गेले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. करिता शासनाने ही दरवाढ नियंत्रणात आणावी व सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार नाही याची दक्षता घ्यावी. - प्रियंका सार्वे (गृहिणी)