जिल्ह्यात २७ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण भंडारा तालुक्यातील गराडा येथे आढळला. त्यानंतरही रुग्णवाढीचा वेग अतिशय कमी होता. मात्र, ऑगस्ट महिन्यापासून रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यात १०३३, सप्टेंबर महिन्यात ४१४९ आणि ऑक्टोबर महिन्यात ३०८२ एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेमुळे कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आले. जानेवारी महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत कमालीची घट आली. दैनंदिन रुग्ण संख्या ३० ते ३५ वर येऊन पोहोचली. आता तर ही संख्या १० ते २० च्या दरम्यान आहे.
ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही अलीकडे मोठ्या प्रमाणात घटत असल्याचे दिसत आहे. ३१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात ८९८ रुग्ण होते. तर, ३० नोव्हेंबर रोजी ९५९ ॲक्टिव्ह रुग्ण होते. त्यानंतर रुग्णांची संख्या घटत गेली. १ जानेवारीला ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६३ वर आली तर ३१ जानेवारीला हीच संख्या १५९ वर येऊन पोहोचली आहे. १ फेब्रुवारीपासून दररोज ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी होत आहे. शनिवारी जिल्ह्यात १४१ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बॉक्स
१५ कोरोनामुक्त, १५ नवे रुग्ण
जिल्ह्यात शुक्रवारी १५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या, तर १५ नव्या रुग्णांची भर पडली. मोहाडी तालुक्यातील एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ३०२ कोरोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी १२ हजार ८३७ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या, तर ३२४ जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी आढळलेल्या १५ रुग्णांमध्ये भंडारा, तुमसर, लाखनी तालुक्यांत प्रत्येकी पाच रुग्ण आढळून आले. पवनी, साकोली आणि मोहाडी एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात मृत्युदर २.४३ टक्के एवढा आहे.