लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाॅकडाऊनच्या सुरुवातीला कोरोनामुक्त असलेल्या भंडारा जिल्ह्यात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली. आता वर्षभरात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २० हजार पार झाली आहे. दुसरीकडे गत चार दिवसांपासून दररोज रुग्णांचा नवा उच्चांक होत असून, शनिवारी तब्बल ८४६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या, तर चौघांचा मृत्यू झाला. प्रशासनाने आता कठोर पावले उचलली असून, रात्रीची संचारबंदीही घोषित केली आहे.भंडारा जिल्ह्यात २७ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर तब्बल महिनाभराने पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद भंडारा तालुक्यातील गराडा येथे करण्यात आली होती. त्यानंतरही रुग्णवाढीचा वेग अतिशय मंद होता. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांचा अपवाद वगळता रुग्णांची स्थिती नियंत्रणात होती. त्यानंतर जानेवारी महिन्यात तर भंडारा जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असल्याचे दिसत होते; परंतु मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्येचा स्फोट व्हायला लागला. गत तीन दिवसांपासून तर दररोज नवनवीन उच्चांक गाठले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार १७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात भंडारा तालुक्यात ८६९९, मोहाडी १५७२, तुमसर २५४४, पवनी २२१४, लाखनी २११७, साकोली २०६७, लाखांदूर ८०४ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी १५ हजार २८७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर ३५१ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. शनिवारी जिल्ह्यात ५१८४ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यात ३५४, मोहाडी १२४, तुमसर ७९, पवनी ८८, लाखनी १०९, साकोली ७० आणि लाखांदूर २२, असे ६४६ रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी चौघांचा मृत्यू झाला असून, तीन व्यक्ती भंडारा तालुक्यातील आणि एक तुमसर तालुक्यातील आहे. भंडारा तालुक्यातील ५७ वर्षे व ५४ वर्षीय महिला आणि एका ६१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला, तर तुमसर तालुक्यातील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला.वाढती रुग्णसंख्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे.
४३७९ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण भंडारा जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४३७९ झाली असून, त्यात सर्वाधिक २ हजार ३ रुग्ण एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. मोहाडी तालुक्यात ३९२, तुमसर ५४५, पवनी ६२५, लाखनी ४५८, साकोली ३३६ आणि लाखांदूर तालुक्यातील १२० रुग्णांचा समावेश आहे. दररोज रुग्णांची भर पडत असून, त्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अल्प आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह विविध ठिकाणी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जात असून, काही रुग्ण गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.
मास्क न लावणाऱ्यांवर कठोर कारवाई जिल्ह्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढत असताना अनेक जण मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहे. याबाबत त्यांनी शनिवारी एक आदेश निर्गमित केला आहे.