भंडारा : जिल्ह्यात सोमवारी दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला असून आता कोरोनाबळींची संख्या ३०७ वर जाऊन पोहोचली आहे. सोमवारी २९ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्याने बाधितांची संख्या १२ हजार ८०२ एवढी झाली आहे. त्यापैकी १२ हजार ९९७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली तर ३९८ व्यक्ती उपचार घेत आहेत.
सोमवारी २२९ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यातील १४, मोहाडी तालुक्यातील १, तुमसर १३ आणि लाखनी तालुक्यातील १ असे २९ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख कमी होताना दिसत आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात ३०७ व्यक्तींचा बळी गेला. विशेष म्हणजे, मृत्यूदर २.३९ टक्के आहे. जिल्ह्यात रुग्ण आणि मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९ हजार २७८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १२ हजार ८०२ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. त्यापैकी १२ हजार ९७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या रुग्णालयात ३९८ व्यक्ती उपचार घेत आहेत. सोमवारी मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील ६९ वर्षीय पुरुष आणि मोहाडी तालुक्यातील एका ५४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोविड आयसीयू कक्षात उपचार सुरू होते.