जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. दररोज सरासरी १२०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळत होते. एकट्या एप्रिल महिन्यात ३३ हजार व्यक्ती कोरोनाबाधित झाले हाेते तर मृतांचा आकडाही वाढत होता. यामुळे सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. परंतु मे महिना उजाडताच रुग्णांची संख्या घटायला लागली. १ मे रोजी ६८५ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. २ मे राेजी ६१५, ३ मे रोजी ५५०, ४ मे रोजी ५७३ आणि बुधवार ५ मे रोजी ५७८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सर्वांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, मृत्यूची संख्या कमी होण्याचे कोणतेही चिन्हे दिसत नाही. जिल्ह्यात बुधवारी १९ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ९२४ जणांना कोरोनाने बळी घेतला आहे. दररोज सरासरी १० जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोनाची भीती आजही तेवढीच आहे.
बुधवारी २८०९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५७८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. भंडारा तालुक्यात २२९, मोहाडी २६, तुमसर १३०, पवनी ५५, लाखनी ४४, साकोली ७५, लाखांदूर १९ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५३ हजार ७०५ व्यक्ती बाधित आढळून आले. १९ जणांच्या मृत्यूमध्ये भंडारा सात, तुमसर सहा, पवनी आणि साकोली प्रत्येकी दोन तर मोहाडी व लाखनीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजार ५४५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या जिल्ह्यात ८२३६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
बॉक्स
सर्वाधिक मृत्यू जिल्हा रुग्णालयात
जिल्ह्यात आतापर्यंत ९२४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक ५३९ जणांचा मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. भंडारा जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात २१५ व्यक्तींचा तर बाहेर जिल्ह्यातील रुग्णालयात ८३ व्यक्तींचा मृत्यू झाला. ८७ व्यक्ती वाटेत किंवा घरीच मृत्युमुखी पडले आहेत. जिल्हा रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्यांची टक्केवारी ५८.३ आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक गंभीर रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातच उपचारासाठी दाखल होते.
बॉक्स
रिकव्हरी रेट वाढला
एप्रिल महिन्यात ७५ पर्यंत खाली आलेला रिकव्हरी रेट एप्रिल महिन्यात वाढल्याचे दिसत आहे. बुधवारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९४ टक्के होते. गत पाच दिवसांपासून बाधितांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्याचा मृत्युदर १.७२ टक्के आहे.