लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील शेकडो ओबीसी समाजबांधव येथील जिल्हा कचेरीवर धडकले. दसरा मैदानातून प्रारंभ झालेल्या या मोर्चाचे रुपांतर त्रिमूर्ती चौकात सभेत झाले. मोर्चात हातात पिवळे ध्वज आणि डोक्यावर पिवळ्या टोप्या परिधान केलेले समाजबांधव सर्वांचे लक्ष वेधत होते. ओबीसीची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.देशात १९३१ नंतर आजपर्यंत ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच नाही. त्यामुळे ओबीसींना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, त्यासाठी जनगणना अर्जात ओबीसीचा स्वतंत्र रकाना तयार करावा, यासह संविधानाच्या ३४० व्या कलमाची अंमलबजावणी करा, एससी, एसटी प्रमाणे ओबीसींना सर्व शासकीय योजनांना लाभ द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी प्रमाणे सुविधा मिळाव्या या व इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.शनिवारी जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले समाजबांधव शास्त्री चौकातील दसरा मैदानात एकत्र आले. तेथून दुपारी १ वाजताच्या सुमारास गांधी चौक, बसस्थानक मार्गे जिल्हा कचेरीवर धडकले. त्रिमूर्ती चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रदीप ढोबळे होते. मंचावर बाळकृष्ण साळवे, बबलू कटरे, प्रभाकर वाडीभस्मे, ज्ञानेश्वर दमाहे, ओबीसी जनगणना समितीचे प्रमुख समन्वयक सदानंद इलमे, संजय आजबले, भगीरथ धोटे, के.झेड. शेंडे, पांडूरंग फुंडे, मुरलीधर भर्रे, अॅड.अंजली साळवे उपस्थित होते.उपस्थित मोर्चेकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर एका शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी अरुण येरचे यांना निवेदन दिले. या निवेदनात ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, ओबीसींना आरक्षणात असंवैधानिक लावलेली क्रिमेलेअरची अट रद्द करा, ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती द्या, ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या, लोधी समाजाचा केंद्राच्या ओबीसी जातीनिहाय यादीत समावेश करा आदींचा समावेश होता. संचालन संजय आजबले यांनी तर आभार भगिरथ धोटे यांनी मानले.सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थितीओबीसी जनगनना परिषदेच्यावतीने शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्च्यात जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. या मोर्चात खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी खासदार खुशाल बोपचे, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार सेवक वाघाये, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे आदी सहभागी झाले होते.
जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी समाजाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 6:00 AM
ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, त्यासाठी जनगणना अर्जात ओबीसीचा स्वतंत्र रकाना तयार करावा, यासह संविधानाच्या ३४० व्या कलमाची अंमलबजावणी करा, एससी, एसटी प्रमाणे ओबीसींना सर्व शासकीय योजनांना लाभ द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी प्रमाणे सुविधा मिळाव्या या व इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन । हातात पिवळे ध्वज आणि डोक्यावर पिवळ्या टोप्यांनी वेधले लक्ष