- युवराज गोमासेभंडारा : सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यातच मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यास ओबीसींचा विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारला भंडारा शहरात विदर्भस्तरीय दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत येणार हाेते. ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याची तयारी केली होती. याची कुणकुण लागताच भंडारा पोलिसांनी ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते, जिल्हा उपाध्यक्ष श्याम कांबळे व सदस्य अमर भूरे यांना त्यांच्या कार्यालयातुन अटक केली. सायंकाळी ७ वाजता त्यांची सुटका करण्यात आली.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करत कुणबी समाजाचे दाखले देण्याची भूमिका आहे. याविरोधात भंडाऱ्यात मंत्री उदय सावंत यांना ओबीसी क्रांती मोर्चा काळे झेंडे दाखवत आपला रोष व्यक्त करणार होते. त्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टिने संजय मते व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण दिल्यास वैनगंगा नदीत उडी घेऊन सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा ओबीसी क्रांती मोर्चाकडून याआधीच देण्यात आला होता.
आता पुन्हा मंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार असल्याच्या इशाऱ्याने भंडारा पोलीस विभागासह जिल्हा प्रशासनाचे ताण वाढल्याने ही अटक करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यामुळे ओबीसी विरूद्ध शासन, असा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाचा वाढता विरोध या संघर्षाची नांदी ठरण्याचा अंदाज आहे.