आॅनलाईन लोकमतभंडारा : लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे, ओबीसींना न्याय हक्क मिळालाच पाहिजे, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करा, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करा, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू करा यासह विविध मागण्यांना घेऊन कुणबी समाजाचा मोर्चा शनिवारला काढण्यात आला.डोक्यात टोपी, खांद्यावर दुपट्टा, छातीवर बिल्ले आणि हातात झेंडे घेऊन हा मोर्चा भंडारा शहरातील हुतात्मा स्मारक येथून दुपारी १२ वाजता मार्गक्रमण होत १.३० वाजता त्रिमूर्ती चौकात पोहोचला. या मोर्चात सहभागी झालेल्या हजारो कुणबी समाज बांधवांनी केंद्र व राज्य सरकारविरूद्ध घोषणा देऊन आक्रोश व्यक्त केला.दसरा मैदान येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व सदानंद ईलमे, पांडूरंग फुंडे, मुरलीधर भर्रे, संजय आजबले, भगिरथ धोटे यांनी केले. दसरा मैदानावरून निघालेल्या या मोर्चात कुणबी समाजातील महिला भगिणींची संख्या लक्षणीय होती.दसरा मैदान येथून निघालेला हा मोर्चा गांधी चौकमार्गे त्रिमूर्ती चौकात पोहोचल्यानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. मंचावर अन्याय निवारण समितीचे पदाधिकारी व महाविद्यालयीन विद्यार्थी बसले होते. महाविद्यालयीन विद्यार्थी गणेश खडसे, स्वाती सेलोकर, सुधन्वा चेटुले, अश्विनी अतकरी, सचिन चरडे, रूपाली तवाडे, अतुल गेडाम, शुभांगी साकुरे, गायत्री हिरापुरे, निलम झिंगरे, प्रियंका शेंडे यांनी मोर्चेकºयांना संबोधित केले. यावेळी या विद्यार्थ्यांनी शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांसमोर असलेल्या समस्या पोटतिडकीने मांडल्या. कुणबी समाजाच्या मताच्या भरोशावर सत्ता मिळविलेल्या राज्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत मतपेटीतून जागा दाखवा, असे आव्हान करीत म्हणाले, राज्यात चार हजारांवर शेतकऱ्यांनी जीवन संपविले असून राज्य सरकारने शेतकऱ्यांप्रती योग्य भूमिका घेतली नसल्याने शेतकरी कुटुंबांची वाताहत होत आहे. त्यामुळे आमदार, खासदारांना लाखो रूपयांचे वेतन पॅकेज व नागपुरातील कोट्यवधी रूपये खर्चून सुरू होत असलेल्या मेट्रोवरील अवाढव्य खर्चावर या विद्यार्थी वक्त्यांनी ताशेरे ओढले.आंदोलनस्थळी ‘एक कुणबी लाख कुणबी’ अशा घोषणा देत भविष्यातील संकटांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी एकदिलाने सामोरे जाण्याचे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक सदानंद ईलमे यांनी केले. संचालन मुकूंद ठवकर व जीजा दोनोडे यांनी तर आभारप्रदर्शन भगिरथ धोटे यांनी केले.लोकप्रतिनिधी बसले जमिनीवरनेतेमंडळींना नेहमी व्यासपीठावर जागा मिळते. परंतु शनिवारी निघालेल्या या मोर्चात खासदार नाना पटोले, आमदार डॉ.परिणय फुके, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार सेवक वाघाये, भंडाºयाचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, जिल्हा परिषद सभापती नरेश डहारे, सभापती विनायक बुरडे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य जमिनीवरच ठाण मांडून बसले. त्रिमूर्ती चौकात मोर्चा पोहोचताच नेतेमंडळी किंवा आयोजकांची भाषणे होणार नाहीत, असे सांगून विद्यार्थीच मोर्चाला संबोधित करणार असल्याचे सांगण्यात आल्यामुळे लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकारी मोर्चेकºयांसोबत खाली बसले होते.शिवसेना, मनसेचा पाठिंबाओबीसींवरील अन्यायाबाबत कुणबी समाजाने काढलेल्या मोर्चातील मागण्यांना विविध संघटनांनी पाठिंबा जाहिर केला होता. आंदोलनादरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख विजय शहारे यांनी या मोर्चाला पाठिंबा देऊन मोर्चात प्रत्यक्षरित्या सहभाग घेतला.जिकडे-तिकडे झेंडे व टोपेया मोर्चात कुणबी समाजातील नागरिक सहभागी झाले होते. पाचपैकी दोघांच्या हातात समाजमनाचे प्रतिबिंब दर्शविणारे हातात भगवे झेंडे व ‘ओबीसी समाजाला न्याय द्या’ यासह विविध मागण्या लिहीलेले फलक, प्रत्येकांच्या डोक्यात भगव्या रंगाची टोपी आणि छातीवर लावलले बिल्ले प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होते.आंदोलनकर्त्याला २० हजाराचा फटकाया मोर्चासाठी आलेल्या नरेंद्र वंजारी यांना २० हजाराचा फटका बसला. घरून येताना त्यांनी खिशात २० हजार रूपये आणले होते. गर्दीमध्ये त्यांचे पैसे पडल्याने त्यांना २० हजार रूपयाचे नुकसान सहन करावे लागले. दोन हजार रूपयाच्या एका नोटासह ५०० च्या व १०० रूपयाच्या नोटा त्यांच्या खिशात असल्याची त्यांनी ‘लोकमत’जवळ सांगितले. दरम्यान शोधाशोध व माईकवरून घोषणा देऊनही हरविलेल्या पैशाबाबत माहिती मिळू शकली नाही.पोलिसांचा चोख बंदोबस्तमोर्चात हजारोंच्या संख्येने ओबीसी समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती असल्याने भंडारा जिल्हा पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता. दसरा मैदान ते त्रिमूर्ती चौकापर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. राज्य राखीव दलाच्या तुकडीसह कमांडो, शहर पोलीस, होमगार्डच्या जवानांनी सुरक्षेची कमान हाती घेतली होती. मोर्चाचे स्वरूप मोठे असल्याने त्रिमूर्ती चौक ते बसस्थानकावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती.स्वच्छता समितीचा पुढाकारतीन किलोमीटरच्या मोर्चात ठिकठिकाणी पाण्याचे पाऊच मोर्चेकऱ्यांना देण्यात येत होते. त्रिमूर्ती चौकात नास्ता व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आयोजकांनी स्वच्छता समिती नेमली होती. या समितीने शेवटपर्यंत स्वच्छतेचे काम केले. स्वच्छता करण्याचा पायंडा मोर्चाच्या आयोजकांनी राखला, हे उल्लेखनीय.क्रिमिलेयरमधून कुणबी समाजाला वगळण्यात आले होते. त्याचा आपण पाठपुरावा करून याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत करून दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ओबीसी कमिशनचा तो अहवाल परत पाठविला आहे. समाजासाठी शेवटपर्यंत संघर्षरत राहीन.-डॉ.परिणय फुके, आमदार.
ओबीसींच्या मागण्यांसाठी मोर्चातून ‘आक्रोश’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:01 AM
लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे, ओबीसींना न्याय हक्क मिळालाच पाहिजे, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करा, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करा,.....
ठळक मुद्देमोर्चात हजारोंच्या संख्येने महिला-पुरूष सहभागी : क्रिमिलेयरची जाचक अट रद्द करा, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करा