जिल्हा परिषदेतील प्रकार : अधिकाऱ्यांनी मागितली माफी भंडारा : लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी.एस. पराते हे रजेवर गेल्यानंतर त्यांचा पदभार कुणाला द्यायचा यावरून जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली. जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या कक्षात हा प्रकार घडला. यावेळी उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती विनायक बुरडे, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, धनेंद्र तुरकर, प्रेम वनवे, रामलाल कारेमोरे, उत्तम कळपाते तर मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. अहीरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सुधीर वाळके उपस्थित होते. लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी.एस. पराते हे दोन दिवसांपूर्वी रजेवर गेले. त्यांचा प्रभार उपविभागीय अभियंता आर.एच. गुप्ता यांना देण्यात यावा, असा आग्रह पदाधिकाऱ्यांचा आहे. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी अहीरे यांनी त्यांचा प्रभार उपकार्यकारी अभियंता रामदास भगत यांना देण्यात आले. त्यावर पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर अहीरे यांनी हे प्रकरण अधीक्षक अभियंता यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पाठविले आहे. त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना बोलावून धारेवर धरले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अहीरे म्हणाले, मी नवीन आहे. कोणता अधिकारी कसा आहे, याबद्दल माहिती नाही. अधिकारी फाईल व्यवस्थित पाठवित नाहीत, यापुढे असे होणार नसल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केलयानंतर सर्वजण निघून गेले. (जिल्हा प्रतिनिधी)
पदाधिकाऱ्यांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर
By admin | Published: January 03, 2017 12:26 AM