कामगार आयुक्तांचा समावेश : ९० कामगारांवर उपासमारीचे संकटतुमसर : माडगी (दे.) येथील युनिडेयरीडेन्ट कारखान्यात ९० कामगारांच्या तक्रारीवर भंडारा, तुमसर व गोंदिया येथील वरिष्ठ कामगार अधिकाऱ्यांचे एका पथकाने गुरुवारी दिवसभर चौकशी करून कामगारांचे बयाण नोंदविले. किमान वेतन, कामाचे तास, सुरक्षा व सुविधांची माहिती अधिकाऱ्यांच्या पथकाने घेतली.तुमसर जवळ दुचाकी व चारचाकी वाहनांचे सुटे भाग तयार करणारा युनिडेयरीडेन्ट कारखाना आहे. या कारखान्यात ९० कामगार मागील ५ ते १५ वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांना महिन्यातून १५ ते १९ दिवस कामे दिली जात होती. परंतु मागील सहा महिन्यापासून या कामगारांना अनियमित कामे देणे सुरु करण्यात आले. या विरोधात कामगारांनी संघटनेच्या माध्यमातून कामगार आयुक्तांकडे तक्रार केली होती. एक आठवड्यापूर्वी ९० कामगारांना नोटाबंदी तथा कारखान्यात कामे उपलब्ध नाही म्हणून कामावरून कमी करण्यात आले होते. ९० कामगारांनी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत पंचबुद्धे तथा जिल्हा सेना प्रमुख राजेंद्र पटले यांची भेट घेऊन तक्रार केली. दोन दिवसानंतर काही कामगारांना कारखान्यात कामावर घेण्यात आले. उलट जुन्या कामगारांऐवजी बाहेरच्या कामगारांना येथे बोलाविण्यात आले अशी तक्रार येथील कामगारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. त्या अनुषंगाने तुमसर येथील कामगार अधिकारी जे.एम. बोरकर, गोंदियाचे कामगार आयुक्त लोथे, भंडाराचे कामगार आयुक्त शर्मा तथा उके, गिरीपुंजे तथा कुंभले या अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी कारखान्यात धडकले. या अधिकाऱ्यांनी ९० कामगारांचे बयाण नोंदविले. कारखान्यातील इतर कामगारांशी संवाद साधून माहिती घेतली. यात किमान वेतन, भत्ते, सुरक्षा, सुविधांची माहिती प्रत्यक्ष कामगारांकडून जाणून घेतली. या कारखान्याअंतर्गत इतर काही वर्कशॉप मध्ये कामे देण्यात येतात. त्यांच्याकडून तसा परवाना आहे काय? कोणत्या नियमांच्या आधारे त्यांना कामे देण्यात आली. याची चौकशी या अधिकाऱ्यांनी केली. येथे कामगारांत सध्या असंतोष खदखदत आहे. ९० कामगारांवर उपासमारीचे संकट ओढविल्याची माहिती कामगारांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)कामगार आयुक्तांचे एक पथक कारखान्यात गुरुवारी दाखल झाले होते. अधिकाऱ्यांची ही नियमित भेट होती. याप्रसंगी त्यांनी कारखान्याच्या कामगारांशी बोलणी केली. कोणती विचारपूस केली त्याची माहिती नाही.- एस.चक्रवर्तीपर्सनल आॅफिसर, युनिडेअरिडेन्ट कारखाना माडगी (दे.)
युनिडेयरीडेन्ट कारखान्यात धडकले अधिकाऱ्यांचे पथक
By admin | Published: January 22, 2017 12:27 AM