पवनी (भंडारा) : पवनी तालुक्यातील पवनी-ब्रम्हपुरी मार्गावरील खातखेडा गावाजवळ रस्त्यावर बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वाघाने केलेल्या हल्ल्यात एक गावकरी ठार झाला. त्यानंतर संतप्त जमावाने वनाधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यात एसीएफ यशवंत नागुलवार यांच्यासह दोन वन अधिकारी जखमी झाले. त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सायंकाळी वाघाला ट्रँक्यूलाइज करून सायंकाळी गोरेवाडा येथे पाठविण्यात आले आहे.
ईश्वर सोमा मोटघरे (५८, खातखेडा) असे मृताचे नाव आहे. सकाळी शेळ्या चारण्यासाठी गेलेला ईश्वर घरी परतलाच नाही. त्याऐवजी शेळ्या घरी आल्या. परिसरात वाघाची दहशत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. गावकऱ्यांनी शोधाशोध केली असता खातखेडा-सावरला रस्त्याच्या बाजूला रक्त सांडलेली जागा व मोटघरे यांची चप्पल आढळली. घटनास्थळापासून २० ते २५ फुटांवर मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. यामुळे गावकरी संतप्त झाले. वाघाला पकडल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही, असा पवित्रा घेऊन रस्त्यावर ठिय्या दिला. उल्लेखनीय म्हणजे २३ जून रोजी याच वाघाने गुडेगाव येथे एका इसमाचा बळी घेतला होता.
या घटनेनंतर गर्दी पांगविण्यासाठी आणि प्रेत ताब्यात घेण्यासाठी अड्याळ, लाखांदूर येथून पोलिस कुमक मागविण्यात आली. भंडारा येथून राज्य राखीव दलाच्या तुकडीलाही पाचारण करण्यात आले. त्यांतर वनाधिकाऱ्यांनी ईश्वर मोटघरे यांचे प्रेत ताब्यात घेतले व शवविच्छेदनासाठी पवनीला पाठविले.
उपवनसंरक्षकांना मारहाण
दरम्यान, दुपारी घटनास्थळी भेट देण्यासाठी वनाधिकाऱ्यांचे पथक आले असता संतप्त गावकऱ्यांनी या पथकावर हल्ला केला. त्यात भंडाराचे सहायक उपवनसंरक्षक यशवंत नागुलवार, सावरलाचे क्षेत्रसहाय्क दिलीप वावरे, धानोरीचे वनपाल गुप्ता जखमी झाले. त्यांना पोलिस संरक्षणात पवनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले नंतर सायंकाळी नागपूरला हलविण्यात आले आहे.
पुन्हा एकावर हल्ला
या घटनेदरम्यान, वाघाला पाहण्यासाठी गेलेल्या युवक नांदीखेडा येथील गुरुदास ऊईके (२५) या युवकावर वाघाने हल्ला करून जखमी केले. त्यालाही तातडीने सावरला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
वाघ जेरबंद
घटनेनंतर सायंकाळी नवेगाव बांध येथून पाचारण केलेल्या एनएनटीआरच्या पथकाने गर्दी पांगल्यावर वाघाचा ड्रोन कॅमेऱ्याने शोध घेतला. सायंकाळी ६.३० वाजता बेशुद्ध केले. शॉर्प शूटर मिथुन चव्हाण यानी डॉर्ट दिले. वाघाला पोलिस बंदोबस्तात गोरेवाडा येथे पाठविण्यात आले आहे.