लाखांदूर : मुलीच्या भेटीसाठी भरउन्हात सायकलने निघालेल्या एका वृद्धाचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव (कोहळी) येथे मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. तहान लागल्याने कालव्यात उतरताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. पांडुरंग अर्जुन गायकवाड (६५) रा. वडेगाव ता. कुरखेडा जि. गडचिरोली असे मृताचे नाव आहे. मंगळवारी तो आपल्या सायकलने गावाहून पिंपळगाव (कोहळी) येथे राहणाऱ्या आपल्या मुलीला भेटण्यासाठी सायकलने निघाला. कालव्याच्या रस्त्याने येत असताना उन्हामुळे त्याला तहान लागली. पाणी पिण्यासाठी कालव्यात उतरताना अचानक पाय घसरून तो कालव्यात पडला. कालव्याच्या पाण्यातील प्रवाहाने तो दीड किलोमीटरपर्यंत वाहत गेला. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच त्यांनी घटनास्थळ गाठले. ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात पंचनामा करण्यात आला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
मुलीला भेटण्यासाठी येणाऱ्या वृद्धाचा कालव्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:38 AM