भंडारा : जिल्ह्यात मंगळवारी रात्री दमदार पाऊस बरसला असून नदी-नाल्या ओसांडून वाहत आहेत. गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे बुधवारी उघडण्यात आले असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच, तुमसर तालुक्याच्या विहीरगाव येथे एका तरुणाचा नाल्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. सकाळी फिरायला गेलेल्या तरुणांना नाल्यात मृतदेह तरंगताना दिसल्याने एकच खळबळ उडाली.
ही घटना आज (दि. १३) सकाळी १० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. राजू पांडेय (५२) रा. हसारा ता. तुमसर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो रात्रीच्या वेळेस नाल्याच्या पुलावरून पडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. खापापासून तीन किमी अंतरावरील विहीरगाव परिसरात सकाळी काही तरुण फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांना गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यात एक मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती पोलीस पाटलांना देण्यात आली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटलांनी ही माहिती मोहाडी ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. ही व्यक्ती तुमसरलगतच्या हसारा येथील राजेश असल्याची ओळख पटली.
तो बुधवारी रात्री विहीरगाव येथे काही कामानिमित्त आलेला होता. रात्री नऊ वाजेच्या सुमारास गावी जात त्याचा नाल्याच्या पुलावरून तोल जाऊन पडला असावा, असा संशय आहे. माहाडी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली असून तपास पोलीस हवालदार भोंगाळे करीत आहेत.