भंडारा : १० फेब्रुवारी हा दिवस आरोग्य विभागाने हत्तीरोग दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला असून पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर १० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात डिईसी व अॅल्बेन्डाझोल गोळया प्रत्यक्षात खाऊ घालण्याचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. हत्तीरोग हा डासांमुळे फैलावणारा रोग असून क्युलेक्स डासाची मादी याचा प्रसार करण्यास कारणीभूत असते. जंतू असलेली मादी चावल्यास प्रत्येकच वेळी संसर्ग होतोच असे नाही, कारण हत्तीरोगाचे जंतू हे मादी डासामार्फत त्वचेवर सोडले जातात. त्यानंतर जंतूना स्वत: त्वचेवर जखम अथवा छिद्र शोधून शरीरात शिरण्याचे काम करावे लागते. डासाच्या वारंवार चावल्यानंतर काही व्यक्तीनांच हत्तीरोगाची लागण होते. हत्तीरोग दुरीकरणासाठी दरवर्षी हत्तीरोग समस्याग्रस्त भागात एक दिवसीय डीईसी व अल्बेंडाझोल गोळयांची सामुदायिक औषधोपचार मोहिम राबवून देशातून हत्तीरोग समुळ उच्चाटन करण्याचा आरोग्य विभागाचा उद्देश आहे. दोन वषार्खालील बालके, गरोदर माता व आजारी रुग्णांना या कार्यक्रमातून वगळायचे आहे. ही मोहिम ग्रामीण भागात १० ते १२ फेब्रुवारी व शहरी भागात १० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत राबविली जाणार आहे. डीईसी गोळयांची फक्त एक मात्रा वषार्तून एकदाच म्हणजे राष्ट्रीय हत्तीरोग दिवशी घ्यावयाची आहे. या गोळयांची एक मात्रा रुग्णाचे शरीरातील सर्व मायक्रोफायलेरीयाचा नाश करते. त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते. डीईसी गोळया उपाशीपोटी घेऊ नये, उपाशी पोटी घेतल्यास मळमळ उलटी सारखा किरकोळ त्रास होऊ शकतो म्हणून डिईसी गोळया या काहीतरी खाल्यानंतरच घ्याव्यात, असे जिल्हा हिवताप अधिकारी भंडारा यांनी कळविले आहे. (नगर प्रतिनिधी)
एक दिवसीय हत्तीरोग औषधोपचार मोहीम
By admin | Published: February 10, 2017 12:35 AM