पालांदूर : कोरोनाचे संकट संपूर्ण राज्यभर घोंगावत आहे. शासनाने यातून मार्ग काढण्याकरता विविध प्राथमिक उपचाराची सूचना सर्वांना दिलेले आहेत, परंतु मनातील भीती दूर न झाल्याने शिक्षण विभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. मात्र, शिक्षक, पालक यांच्यात जागरूकता तयार होऊन कोरोनाविषयीची जनजागृती करून शाळेला शंभर टक्के उपस्थिती प्रेरणादायी आहे. हा कौतुकास्पद प्रकार चूल बंद खोऱ्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मऱ्हेगाव येथे अनुभवायला मिळालेला आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यासाठी पालक-शिक्षक सभा घेऊन पालकांच्या मनात असलेली कोरोनाविषयी भीती घालविल्यामुळे, तसेच कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधांचा पुरवठा करून संरक्षण विषयक वातावरण निर्मिती केल्याने, शाळेत आज विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती दिसत आहे.
कोरोना परिस्थितीत ९ महिन्यांच्या कालावधीनंतर २७ जानेवारी रोजी शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या थांबलेल्या प्रगतीला चालना मिळावी. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने वर्ग ५ ते ७ च्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आली. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात शाळा सुरू झालेल्या नाहीत, परंतु ज्या ठिकाणच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, तेथील विद्यार्थी उपस्थिती नगण्य आहे, परंतु याला अपवाद ठरत, लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेली मऱ्हेगाव शाळेत मात्र १०० टक्के उपस्थिती आढळून येते. याकरिता विशेष मेहनत शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक व गावातील सूज्ञ जागरूक पालक आहेत. शाळेचे मुख्याध्यापक भोंडे, शिक्षक सतीश वासनिक, ज्ञानेश्वर कळंबे व विनोद चारमोडे या शिक्षकवृंदांनी केलेले यशस्वी नियोजन, पालकांचे सहकार्य, विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे असलेला कल व शिक्षकांचे उत्कृष्ट अध्यापन, भौतिक सुविधांची सोय यामुळेच हे शक्य झाले.
इतरही होतकरू शिक्षकांनी शिक्षणाविषयीची गोडी विद्यार्थ्यांना चाखण्याकरिता शासनाने पुरविलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत कोरोना काळातही शाळा सुरू करावे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता प्रयत्न करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक लिंक खंडित होणार नाही व कोरोनाविषयी जनजागृती होत मनातली भीती दूर होईल, अशी अपेक्षा समाज मनातून उमटत मऱ्हेगाव येथील गावकऱ्यांचे, शिक्षकांचे कौतुक होत आहे.