लाखांदूर : रात्रीच्या सुमारास दोघेजण पनीर घेऊन दुचाकीने स्वगावी जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी रात्री ७:३० च्या सुमारास तालुक्यातील कऱ्हांडला - विरली राज्यमार्गावर घडली. सचिन मिसार (वय २५, रा. डोकेसरांडी) असे मृताचे, तर श्रीराम मिसार (२५, रा. डोकेसरांडी) असे जखमीचे नाव आहे.
सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास दोन्ही तरुण तालुक्यातील डोकेसरांडी येथून दुचाकी (क्रमांक एमएच ३३ एन ४००६)ने पनीर घेण्यासाठी विरली बु. येथे गेले होते. विरली येथे पनीर न मिळाल्याने ते आसगाव येथे गेले. यावेळी दोन्ही तरुणांनी आसगाव येथील एका दुकानातून पनीर खरेदी करून रात्री ७ च्या सुमारास ते गावाकडे परत येण्यास निघाले.
पनीर घेण्यासाठी गेलेल्या तरुणांना घरी परत येण्यास उशीर झाल्याने कुटुंबीयांनी मोबाईलवरून संपर्क करून शहानिशा केली असता, संबंधित तरुणांनी कऱ्हांडला गावाजवळ असल्याचे सांगितले. मात्र केवळ ३ कि.मी. अंतरावर असताना तब्बल १ तासाहून अधिक वेळ लोटूनही ते स्वगावी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी परत मोबाईलवरून संपर्क केला. पण अपघातग्रस्तांच्या मोबाईलवर संपर्क होऊन देखील उत्तर मिळत नसल्याने कुटुंबीय घाबरले. कुटुंबीयांनी तात्काळ विरली गावाकडे दुचाकीने धाव घेतली असता, कऱ्हांडला - विरली राज्यमार्गावरील वळणावर दोन्ही तरुण दुचाकीसह रस्त्यालगतच्या नाल्यात पडल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी दोन्ही तरुणांना उपचारार्थ तात्काळ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी सचिन मिसार नामक तरुणाला मृत घोषित केले, श्रीराम मिसार याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.
लाखांदूर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास पोलीस निरीक्षक मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.