तुमसर/लाखांदूर/करडी : जिल्ह्यात गत २४ तासांत घडलेल्या तीन अपघातात एक जण ठार तर १४ जण जखमी झाले. जखमींमध्ये १२ वऱ्हाड्यांचा समावेश आहे. अजाब हरिचंद बुरडे रा.मोहगाव (करडी) असे मृताचे नाव आहे. तुमसर तालुक्यातील तुमसर बालाघाट मार्ग, लाखांदूर तालुक्यातील लाखांदूर-वडसा मार्ग तर तिसरी घटना देव्हाडी साकोली राज्यमार्गावर घडली.तुमसर : तालुक्यात रस्त्यावर उभ्या ट्रकला वव्हाड घेऊन जात असलेल्या वाहनाने धडक दिली. यात १२ प्रवाशी गंभीर जखमी झाले. चार प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. उर्वरीत प्रवाशांवर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात तुमसर बालाघाट आंतरराज्यीय महामार्गावर चिचोली फाट्याजवळ दि.२१ च्या रात्री ८.३० च्या सुमारास घडला.आंधळगाव येथील ही वरात तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे गेली होती. लग्न आटोपून काही वऱ्हाडी चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. ३१ एएच ७८३ ने आंधळगावकडे रात्री ८ वाजता निघाले. या प्रवाशी वाहनात सुमारे २२ ते २५ प्रवाशी असल्याची माहिती आहे. चिचोली फाट्याजवळ ट्रक क्रमांक एम.पी. २२ झेड १७१५ उभा होता. चालकाने एका वाहनाला ओव्हरटेक करताना उभ्या ट्रकवर वऱ्हाड्यांचे वाहनाने धडक दिली.यात कल्पना उके (३९), सुची उके (८), मुकेश टेकाम (२५), चंद्रप्रकाश शामकुवर (३५), निमेश शामकुवर (२७), पवराबाई शामकुवर (६१), सेवकदास उके (५०), नवसाबाई शामकुवर (५८), यादवराव शामकुवर (६२) (सर्व राहणार तिरोडी), नरेंद्र उके (४५), दीक्षांत उके (१२), येशू उके (१०) (सर्व राहणार नागपूर) गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी जखमींना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यापैकी चार वऱ्हाड्यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना भंडारा येथे सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. सध्या लग्न सराईची धूम आहे. खासगी वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी कोंबून सर्रास वाहतूक सुरु आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा स्थानिक पोलीस विभागाचे दुर्लक्ष हे प्रमुख कारण आहे. की यात अर्थकारण दडले आहे हा मुख्य प्रश्न आहे. प्रत्येक राज्य महामार्गावर प्रमुख चौकात पोलीस विभागाची तैनाती असते. तर वाहनात कोंबून प्रवाशी कसे भरले जातात, हा संशोधनाचा विषय आहे.लाखांदूर : दुचाकी चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन जण गंभीर झाले.यशवंत केवळराम मेश्राम रा.अर्जुनी मोर. (५०) व नितेश ओमप्रकाश नंदेश्वर रा.आगमाव जि.गडचिरोली (२४) अशी जखमींची नावे आहेत. नितेशने मद्यप्राशन केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो मद्यप्राशन करून वडसामार्गे दुचाकी क्र. एमएच ३३ जे २४८० ने आमगावकडे निघाला. जिल्ह्याच्या सीमेवर वडसाहून लाखांदूरकडे येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएम ३५ वाय ८९२२ ला त्याने जोरदार धडक दिली. यात यशवंत यांचा पाय मोडला गेला. नितेशही गंभीररित्या जखमी झाला. वाहतूक पोलीस अरविंद अंबादे यांनी घटनास्थळी पोहचून सोनी येथील गावकऱ्यांच्या मदतीने खासगी वाहनाने दोघांना लाखांदुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दोन्ही जिल्ह्यात दारुबंदी असल्याने लाखांदूर येथे मद्यपींची वर्दळ वाढली आहे. अशातच लग्नसराईमुळे रस्त्यावरील वाहतूकही वाढली आहे. मद्यप्राशन करून वाहन सुसाट वेगाने चालवित असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा अपघातस्थळी नागरिकांमध्ये सुरु होती. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)अपघातात इसम ठारकरडी (पालोरा) : चारचाकी वाहनाने सायकलस्वाराला धडक दिली. यात सायकलस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अजाब हरिचंद बुरडे रा.मोहगाव (करडी) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास देव्हाडा साकोली राज्य मार्गावर घडली. घटनेची माहिती महेंद्र शेंडे यांनी करडी पोलिसांनी दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तपास करडी पोलीस करीत आहेत.
तीन अपघातांत एक ठार ; १४ जखमी
By admin | Published: April 23, 2015 12:13 AM