भंडारा/अड्याळ : पवनी तालुक्यातील कलेवाडा शिवारात दाेन बिबट्यांच्या मृत्यू प्रकरणात वनविभागाने शेतमालकाच्या मुलाला मंगळवारी ताब्यात घेतले. त्याची दिवसभर कसून चाैकशी करण्यात आली. दरम्यान विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
कलेवाडा येथील सरस्वता ज्ञानेश्वर घाेगरे यांच्या शेतात साेमवारी सकाळी दाेन बिबट मृतावस्थेत आढळले हाेते. या घटनेने एकच खळबळ उडाली. शवविच्छेदन करुन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले हाेते. दरम्यान मंगळवारी शेतमालकाचा मुलगा सदानंद ज्ञानेश्वर घाेगरे (४२) याला ताब्यात घेतले. त्याची अड्याळ वनविभागाच्या कार्यालयात कसून चाैकशी सुरू आहे. परंतु त्याने नेमके काय? सांगितले ही माहिती कळू शकली नाही. दरम्यान उपवनसंरक्षक शिवराम भलावी यांच्या आदेशानुसार शेताच्या दीड किलाेमीटर परिसरात काेंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या बिबट्याने शिकार केली काय? याचा शाेध घेतला जात आहे.
दरम्यान ज्या विहिरीत बिबटाचे मृतदेह आढळले हाेते. त्या विहिरीच्या पाण्याचे आणि मातीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. विहिरीच्या पाण्यात युरिया आहे काय? याची पाहणी केली जाणार आहे. या शेतात धान आणि गव्हाचे पीक असून नेमके दाेन नर बिबट या विहिरीत कसे पडले याचा शाेध वनविभागाच्या वतीने घेतला जात आहे.