भंडारा : भरधाव वेगातील रेती टिप्पर व दुग्ध वाहनात कट मारण्याच्या नादात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत वाहनचालक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मांडवीजवळ ५०० मीटर अंतरावर घडली. या घटनेत दुधाचे वाहन ५० फूट अंतरावर पलटले. तर ट्रकचेही अताेनात नुकसान झाले. गंभीर जखमी दुग्ध वाहनचालकाचे नाव अमित मोहतुरे (३०, रा. विहिरगाव, ता. मोहाडी) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुग्ध वाहन क्रमांक (एमएच ३६ एफ १८५०)चा चालक अमित मोहतुरे मांडवी येथे दुग्ध संकलनाचे काम आटोपून करडीकडे जायला निघाला होता. तर टिप्पर क्रमांक (एमएच ४० बीजी ५६४९)चा चालक रेती भरलेला टिप्पर खडकी ते भिलेवाडा मार्गाने भंडाराकडे येत होता. भरधाव वेगात असलेल्या वाहनांमध्ये मांडवी गावाशेजारी कट मारण्याच्या नादात भीषण धडक बसली. दोन्ही वाहनांचे समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. टिप्परचे चाक तुटले तर केबिनचे नुकसान झाले. दुग्ध वाहनही सुमारे ५० फूट अंतरावर वेगाने फेकले जाऊन पलटल्याने अतोनात नुकसान झाले. दुग्ध वाहनचालक अमित मोहतुरे केबिनमध्ये फसल्याने गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती होताच मांडवी परिसरातील मदतीसाठी धाव घेतली. कारधा पोलिस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत काळे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तातडीने गंभीर जखमीस उपचारासाठी रवाना करण्यात आले. भंडारा शहरातील डॉ. कुथे यांच्या खासगी रुग्णालयात त्यावर उपचार सुरू आहे. पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनात कारधा पोलिस करीत आहेत.
टिप्परचालक पसार
भीषण अपघातानंतर टिप्परचालक घटनास्थळावरून पसार झाला. टिप्पर हा नागपूर येथील असल्याचे सांगण्यात आले. तर दुग्ध वाहन भाऊराव तुमसरे यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आले.