लाखांदूर (भंडारा) : दुपारी दोन दुचाकींची टक्कर होऊन तीन जण गंभीर जखमी होण्याची घटना ताजी असताना त्याच ठिकाणी रात्री पुन्हा दोन दुचाकींची टक्कर होऊन एक तरूण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात लाखांदूर तालुक्यातील आसोली येथे सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडला. एकाच दिवशी एकाच ठिकाणी दाेन अपघात झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अनिल सुखदेव ठाकूर (३०) रा. लाखांदूर असे मृताचे नाव आहे. सुभाष उद्धव नान्हे (२५) रा. आसोला, निखिल लोखंडे (२५) आणि प्रफुल एकनाथ मिसार (२४) रा. डोकेसरांडी ता. लाखांदूर अशी जखमींची नावे आहेत. आसोला गावानजीक सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची टक्कर होऊन दोनाड येथील प्रज्वल भानारकर (१७), मोहरणा येथील विजय बावणे (२६) व पत्नी अन्नपूर्णा बावणे (१९) जखमी झाले होते.
या अपघाताला आठ तास लोटत नाही तोच असोला येथील भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमात महाप्रसाद घेऊन अनिल व प्रफुल दुचाकीने (क्रमांक एम एच ३६ एन ८८४५) रात्री लाखांदूरकडे जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने (क्रमांक एम एच ३५ एल ९८१२) धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक अनिल व प्रफुल तर दुसऱ्या दुचाकीवरील सुभाष व निखिल गंभीर जखमी झाले.
उपचारापूर्वीच मृत्यू
अपघाताची माहिती होताच लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम, पोलिस नाईक दुर्योधन वकेकार, पोलिस अंमलदार राहुल गायधने तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी अनिल ठाकूर याला तपासताच मृत घोषित केले. जखमी सुभाष व निखिल यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. प्रफुल मिसार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.