देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उन्हाळ्याची दाहकता सुरू असून जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे. शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ १६ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे. गत हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला. हे त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात दोन टक्क्यांनी घट झालेली आहे.लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पात केवळ ७. ९९ टक्के जलसाठा आहे. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे. सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ०.३१, बघेडा १४.७७, बेटेकर बोथली ३९.२८ आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा २१.३० टक्के आहे. जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्यस्थितीत ३९ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२.०६ टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा १७.०७ टक्के आहे.जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी, पवनी तालुक्यातील वाही, भिवखिड़की, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी. लाखांदूर तालुक्यातील सालेवर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शीपार या प्रकल्पांचा समावेश आहे.गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे, असे असले तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ १९.५७ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे. गतवर्षी ४ जून रोजी ६३ प्रकल्पात १८.८४ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता. त्याची टक्केवारी १५.४८ एवढी होती. २०२० मध्ये २६.६९, टक्के जलसाठ्याची नोंद आहे. यावर्षी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये “पाण्याचा अल्प साठा आहे. त्यामुळे जनावरांसाठी तसेच वन्य प्राण्यांसाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे.
तीन प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट- लघु पाटबंधारे विभागांतर्गत खचलेल्या तीन प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. यात साकोली तालुक्यातील लवारी, केसलवाडा व कुंभली प्रकल्पांचा समावेश आहे. इतर प्रकल्पांमध्ये जलसाठा नाममात्र आहे. गोसेखुर्द धरणात १४८.५४ दलघमी उपयुक्त साठा असून त्याची टक्केवारी २०.०७ एवढी आहे. बावनथडी प्रकल्पात ५.२८ दलघमी उपयुक्त साठा असून त्याची टक्केवारी २.४३ टक्के एवढी आहे. भंडारा शहरानजीकच्या कारधा येथील वैनगंगा नदीपात्रात ४.४८ दलघमी जलसाठा आहे. - हवामान खात्याने आठवड्याभरानंतर मान्सूनचे आगमन होणार असल्याचे संकेत दिले आहे. सध्या मात्र अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावल्याने पाणीबाणी स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनचे लवकर आगमन न झाल्यास पाण्यासाठी नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाल्यास नवल वाटू नये. सध्या तरी अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.