ज्ञानेश्वर मुंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पावसाने दडी मारल्याने पूर्व विदर्भातील ३८४ प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत केवळ ४८.६९ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पांमध्ये ७२.५५ टक्के जलसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत २३.८६ टक्के जलसाठा कमी आहे. जोरदार पाऊस बरसला नाही तर रबी हंगामातील सिंचन आणि उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
(Only 48.69 per cent water storage in 384 projects in East Vidarbha)
पूर्व विदर्भात १६ मोठे प्रकल्प, ४२ मध्यम आणि ३२६ लघु प्रकल्प आहेत. भात शेतीसाठी या प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. दरवर्षी या प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा असतो. त्यामुळे रबी हंगामातही प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडले जाते; मात्र यंदा पावसाने दीर्घ विश्रांती घेतली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात तर पावसाने सरासरीही गाठली नाही. परिणामी, प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली नाही.
नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांमध्ये २७८४.९८ दलघमी जलसाठा आहे. त्याची टक्केवारी ५६.१८ असून, गतवर्षी या प्रकल्पात ७७.३१ टक्के जलसाठा होता. ४२ मध्यम प्रकल्पात सद्यस्थितीत २२८.७७ दलघमी जलसाठा असून, त्याची टक्केवारी ३१.४५ आहे. गतवर्षी या प्रकल्पात ५८.८७ टक्के जलसाठा होता. ३२६ लघू प्रकल्पात १२८.३७ दलघमी जलसाठा असून, त्याची टक्केवारी १९.२३ आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये ५७.२१ टक्के जलसाठा होता. सर्व ३८४ प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत सरासरी २३.८६ जलसाठा कमी आहे.