लाखांदूर : यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या पाण्यासह विविध सिंचन सुविधेंतर्गत तालुक्यात एकूण १३ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रात धानाची रोवणी करण्यात आली. ही लागवड केवळ ५४ टक्के असल्याची माहिती तालुका कृषी विभागांतर्गत देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामात कृषी वीज पंप, गोसेखुर्द कालव्याचे पाणी व पावसाच्या पाण्याने सिंचन उपलब्ध झाल्याने तालुक्यातील एकूण १३ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड पूर्ण झाली आहे. मात्र, यंदा खरिपात सुरुवातीपासूनच इटियाडोह धरणांतर्गत नहरांद्वारा सिंचनासाठी पाणी उपलब्ध न करण्यात आल्याने तालुक्यातील जवळपास ४ हजार ६७७ हेक्टर क्षेत्रातील धान रोवणी रखडली आहे. तालुक्यातील काही क्षेत्रांत सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने पावसाच्या पाण्याने शेतात सिंचन केले जाते. त्यानुसार तालुक्यातील ४९५ हेक्टर क्षेत्रात आवत्या धानाची लागवड करण्यात आली आहे. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली नसल्याने तालुक्यातून अर्ध्याहून अधिक क्षेत्रात धानाची लागवड रखडली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
लाखांदूर तालुक्यात एकूण ५ कृषी मंडळे आहेत. या मंडळांत विरली बु., भागडी, मासळ, बारव्हा व लाखांदूर आदी मंडळांचा समावेश आहे. मात्र, भागडी, विरली बु. व मासळ या तीन मंडळांतील शेतकऱ्यांना कृषी वीज पंपाद्वारा सिंचन सुविधा उपलब्ध होत असल्याने अधिकांश शेतकऱ्यांची धान लागवड पूर्ण झाली आहे. या क्षेत्रात गोसीखुर्द धरणाद्वारे सिंचन सुविधा उपलब्ध केली जात असल्याने या क्षेत्रातील बहुतांश भागात धान लागवड पूर्ण झाली आहे.
उर्वरित लाखांदूर व बारव्हा क्षेत्रांत पावसाचे पाणी व कृषी वीज पंप सुविधेंतर्गत सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या काही भागांत धानाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, इटियाडोह बांधअंतर्गत नहरांद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध न करण्यात आल्याने या क्षेत्रातील धान रोवणी रखडली असल्याचा दावादेखील शेतकऱ्यांनी केला आहे. एकंदरीत तालुक्यातील पाच कृषी मंडळांतर्गत दरवर्षी खरिपात एकूण २५ हजार ७७६ हेक्टर क्षेत्रात धानलागवड केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.