भंडारा पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांतर्गतचा मध्यम प्रकल्प ३१ लघु प्रकल्प तर २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. लघु प्रकल्पामध्ये सध्या ६८.२६ टक्के जलसाठा आहे. यात चांदपूर जलाशयात ७३.५७ टक्के, बघेडा ९७.३३, बेटेकल बाेथलीत ३९.२८ तर साेरणा प्रकल्पात ३७.०५ टक्के जलसाठा आहे. ३१ लघु प्रकल्पात ५२.५६ टक्के जलसाठा आहे. तर २८ जुने मालगुजारी तलावात ५३.६५ टक्के जलसाठा आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. त्यामुळे जुलै, ऑगस्ट महिन्यात जलसाठ्यात यावर्षी घट दिसून आली. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्यानंतर जलसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. लघु प्रकल्पामध्ये कुरमुडामध्ये ४१.३३, पवनारखारी २५.४५, आंबागड २५.११, कारली ४३.८८, टांगा ७५.६५, हिवरा १७.४४, आमगाव ५९.४०, डाेडमाझरी ३०.३६, मालीपार ४१.४१, चिखलपहेला ४४.६३, रावणवाडी १३.६७, सिल्ली आंबाडी ४९.६६, वाही ४९.७२, भिवखिडकी ६२.७०, कातुर्ली २७.८३, पिलांद्री ८०.८७, शिवनीबांध ५३.६६, कुंभली ३६.६३, गुढरी ७७.११, सालेबर्डी ४५.०९, भुगावमेंढा ५९.५७, मुरमाडी हमेशा ६०.८१, रेंगेपार काेठा ३१.४७, निहारवाणी ७१.९७ तर खुर्शिपार लघु प्रकल्पात १९.९० टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील ११ प्रकल्प तुडुंब
सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसानंतर जिल्ह्यातील ११ प्रकल्प तुडुंब भरले आहेत. यात कवलेवाडा, परसवाडा, डाेंगरला, नागठाणा, मंडनगाव, वाकल, परसाेडी, लवारी, रेंगेपार काेहळी, कनेरी, चान्ना या प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा संचित झाला आहे.
गतवर्षी जलसाठा ९७.१३ टक्के एवढा हाेता. तर २०१९ मध्ये जलसाठा ७९.२३ टक्के हाेता. गत दाेन वर्षाची तुलना केल्यास या वर्षी ६३ प्रकल्पांमध्ये केवळ ५८.३१ एवढा जलसाठा आहे. सध्या धान पीक जाेमात असून या पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकरी काहीसा सुखावला आहे.